अख्तर काझी
दौंड : शहरातील सावरकरनगर या उच्चभ्रू वसाहतीमधील दाताच्या दवाखान्याचे शटर उचकटून दवाखान्यात लग्नासाठी ठेवलेले तब्बल दोन लाख रुपये अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी डॉक्टर विवेक भास्कर सातपुते (वय 29,रा. शिवाजीनगर श्रीगोंदा, जिल्हा अ. नगर) यांनी फिर्याद दिली. दौंड पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
दौंड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदरची घटना दिनांक ३ एप्रिल रोजी रात्री 7.30 ते 4 एप्रिल रोजी सकाळी 9 च्या दरम्यान लिंगाळी हद्दीतील दौंड कॉलेज रोडवरील वीर सावरकरनगर येथे घडली आहे. फिर्यादी यांचा सावरकरनगर येथे दातांचा दवाखाना आहे. दि. 20 एप्रिल रोजी फिर्यादी डॉक्टर यांचे लग्न असल्याने त्यांनी लग्नाचे साहित्य आणण्याकरिता दोन लाख रुपये दवाखान्यातील टेबलच्या काउंटरमध्ये ठेवलेले होते.
दि.3 एप्रिल रोजी डॉक्टरांनी नेहमीप्रमाणे सकाळी 9 वा. दवाखाना सुरू केला व रात्री 7.30 वा. बंद करून ते श्रीगोंदा येथील घरी गेले. दि.4 एप्रिल रोजी सकाळी 9 वा. सुमारास दवाखान्यामध्ये काम करणाऱ्या महिलेने डॉक्टरांना फोन वरून माहिती दिली की, दवाखान्याचे शटर अर्धवट उघडे असून त्याचे लॉक तोडलेले दिसत आहे. दवाखान्यातील सर्व साहित्य अस्ताव्यस्त पडलेले आहे तुम्ही तात्काळ दवाखान्यात या. असा निरोप मिळाल्यानंतर डॉक्टर त्वरितच दौंडला आले व त्यांनी सदरची घटना पोलिसांना कळविली.
डॉक्टरांनी दवाखान्यात जाऊन पाहणी केली असता लग्नाचे साहित्य आणण्याकरिता टेबलच्या काउंटरमध्ये ठेवलेले दोन लाख रुपये त्यांना मिळाले नाहीत. त्यामुळे त्यांची खात्री झाली की कोणीतरी अज्ञात चोरट्याने दवाखान्याच्या शटरचे कुलूप तोडून दवाखान्यात ठेवलेले दोन लाख रुपये चोरून नेले आहेत.