केडगाव (दौंड) : शनिवारी रात्री 12 वाजनाच्या सुमारास केडगाव मधील मोरे वस्ती येथे 5 ते 6 जणांच्या टोळक्याने चोरी करण्याच्या उद्देशाने एका शेतकऱ्यांच्या डोक्यात कोयत्याने वार केले आहेत.
या घटनेमध्ये मोरे वस्ती मधील 60 वर्षीय शेतकरी पोपट मोरे हे गंभीर जखमी झाले आहेत तर याच परिसरातील देशमुख मळा भागात असणारे अशोक देशमुख यांचे घर देखील चोरट्यांनी फोडले असून त्यांनी या घरातून दोन तोळे सोने चोरून नेले आहे तर काकडे वस्ती मधील नवनाथ देशमुख यांच्या बंगल्याला बाहेरून कडी लावण्याचा प्रकार घडला आहे.
पोपट मोरे हे आपल्या राहत्या घरा समोर झोपलेले असताना अचानक आलेल्या या चोरट्यांनी पोपट मोरे यांच्यावर कोयत्याने वार केला तर पोपट मोरे यांचे भाऊ बाळासाहेब मोरे यांना देखील चोरट्यांनी गळ्याला चाकू लावत धमकावत असताना आरडाओरडा झाल्याने चोरटे पसार झाले. जखमी पोपट मोरे यांच्यावर केडगाव येथील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.
घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, यवतचे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांनी भेट देऊन जखमींची विचारपूस केली. या घटनेबाबत गुन्हा दाखल करून पुढील तपास केला जाईल अशी माहिती पोलिस निरीक्षक नारायण देशमुख यांनी दिली आहे.