नागपूर : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर येथील निवासस्थानाबाहेरील सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या आंदोलनाच्या ईशाऱ्यानंतर सुरक्षेत वाढ करण्यात आली होती. मात्र तरीही आंदोलक त्यांच्या निवास स्थानाबाहेर जाण्याचा प्रयत्न करत होते.
नागपूर येथील प्रस्तावित टाटा प्रकल्प हा गुजरातला गेल्यानंतर राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून नागपूरमध्ये आंदोलन करण्याचा आणि देवेंद्र फडणवीस यांच्या खाजगी निवासस्थानाबाहेर जाऊन आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता. या इशाऱ्यानंतर पोलिसांचा बंदोबस्त वाढविण्यात आला होता. तसेच त्यांच्या घराकडे जाणाऱ्या मार्गांवर बॅरिकेट लावण्यात आले होते.
मात्र राष्ट्रवादीच्या आंदोलकांनी आंदोलन सुरु केल्यानंतर त्यांच्या घरापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केलाच. यावेळी तुम्ही फडणवीस यांच्या खाजगी घराबाहेर आंदोलन करण्याचे कारण विचारले असता, देवेंद्र फडणवीस हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून त्यांच्या कार्यकाळात हे प्रकल्प गुजरातला जात असल्याने येथे आंदोलन करण्यात येत असल्याचे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी सांगितले.