मा.नगराध्यक्ष बादशहा शेख यांच्या अडचणी वाढल्या! जिल्हा सत्र न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला

अख्तर काझी

दौंड : दौंड मधील हाणामारी, ॲट्रॉसिटी प्रकरणात मा. नगराध्यक्ष बादशहा शेख यांचा अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा सत्र न्यायालयाने फेटाळल्याने बादशहा शेख यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

दौंड शहरातील कुंभार गल्ली परिसरात दोन कुटुंबामध्ये झालेल्या हाणामारी प्रकरणात मा. नगराध्यक्ष बादशाह शेख यांच्यासह जवळपास 20 जणांविरोधात ॲट्रॉसिटी, जीवे मारण्याचा प्रयत्न करणे, दंगा, विनयभंग करणे आदि कलमान्वये दौंड पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणात अटकपूर्व जामीन मिळावा म्हणून बादशहा शेख यांनी बारामती, जिल्हा सत्र न्यायालयात दाद मागितली होती. प्रकरणाच्या सुनावणीनंतर मात्र आज दि.23 नोव्हेंबर रोजी सत्र न्यायालयाने बादशाह शेख यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे अशी माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांनी दिली. त्यामुळे शेख यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

सदर घटनेनंतर बादशाह शेख यांना दौंड पोलिसांनी अटक न केल्याने आमदार नितेश राणे यांनी दौंड पोलीस स्टेशन समोर हिंदू जन आक्रोश ठिय्या आंदोलन केले होते, तसेच इंदापूर येथे समस्त हिंदू खाटीक समाजाच्या वतीने बादशहा शेख यांना अटक व्हावी म्हणून मोर्चा काढण्यात आला होता. याच प्रकरणात दौंड पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांची तडकाफडकी बदली ही करण्यात आली होती.

सदरची हाणामारीची घटना 20 ऑक्टोबर रोजी घडली होती. त्यानंतर दि.9 नोव्हेंबर रोजी बादशहा शेख व इतरांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला. तेव्हापासून आजपर्यंत या गुन्ह्यातील चार आरोपींना दौंड पोलिसांनी अटक केली आहे. इतर आरोपींचा दौंड पोलीस तपास करीत आहेत.