अख्तर काझी
दौंड : शहरातील गजबजलेल्या नगरमोरी चौकामध्ये तुषार दत्तात्रय जावरे हा युवक धारदार तलवार बाळगून शहर व परिसरात दहशत निर्माण करीत असल्याची खबर दौंड पोलीस स्टेशनचा नव्यानेच पदभार स्वीकारलेले पोलीस निरीक्षक संतोष डोके यांना मिळाली. त्यांनी त्वरित दौंड पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकास सदर ठिकाणी पाठवून कारवाई केली आहे.
एक युवक हातात तलवार घेऊन दहशत माजवत असल्याची माहिती दौंड पोलिसांना मिळताच पोलीस पथकाने नगरमोरी चौकात जाऊन तुषार जावरे याला ताब्यात घेतले. यावेळी त्याच्याजवळ धारदार तलवार मिळाली. दौंड पोलिसांनी तुषार दत्तात्रय जावरे (वय 20,रा. सिद्धार्थ नगर, दौंड) याच्या विरोधात भारतीय हत्यार कायदा कलम 4 (25) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पो. हवा.अमीर शेख करीत आहेत.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात कायदा सुव्यवस्था रहावी म्हणून दौंड पोलीस ॲक्शन मोडवर आली असल्याचे चित्र आहे. भाईगिरी करून शहराची कायदा सुव्यवस्था बिघडविणाऱ्या गुंडांना हा एक प्रकारे इशाराच दौंड पोलिसांनी दिला आहे.
सदरची कारवाई पुणे जिल्हा ग्रामीणचे पो. अधीक्षक पंकज देशमुख, अप्पर पो. अधीक्षक बारामती संजय जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी (दौंड) स्वप्निल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली दौंड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष डोके, गुन्हे शोध पथकाचे पोलीस हवालदार सुभाष राऊत, पांडुरंग थोरात, नितीन बोरडे, विशाल जावळे, आदेश राऊत, अमोल देवकाते यांनी केली.