दौंड : एक मनोरुग्ण महिला काही दिवसापूर्वी दौंड शहरात आली होती, या महिलेकडून शहरातील व्यापारी वर्ग व विशेषतः शालेय विद्यार्थ्यांना त्रास होत होता. काही प्रसंगी ही महिला बाजारपेठेतील दुकानातून किंवा विद्यार्थी, नागरिकांकडे असणाऱ्या वस्तू हिसकावून घेत होती. शहरातील मुख्य चौकातुन जाणाऱ्या येणाऱ्या नागरिकांना व महिला वर्गाला ती अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत होती. त्यामुळे बाजारपेठेत वादाच्या घटना घडत होत्या. त्यामुळे सर्वच त्रस्त झाले होते. ही बाब दौंड चे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या निदर्शनास आली व त्यांनी या मनोरुग्ण महिलेला योग्य तो आधार देण्याचा निर्णय घेतला.
याबाबत सविस्तर माहिती अशी 'एक मनोरुग्ण महिला गेली सहा महिन्यांच्या कालावधीपासून दौंड व कुरकुंभ परिसरातील रस्त्यांवर इकडे-तिकडे भटकत होती.
काही मिळेल ते खात होती. कधीकधी अनेक वस्तू व खाद्यपदार्थ हिसकावून घेताना नागरिक, व्यापारी व महिलेत झटापट होत होती. या महिलेकडून जास्त त्रास इथल्या व्यापारी वर्गाला आणि रोज
शाळा-महाविद्यालयात ये-जा करणाऱ्या विद्यार्थ्यांना होत होता.
ही महिला सतत शिवीगाळ व त्रास देत असल्याची तक्रार व्यापाऱ्यांनी पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांना केली.
त्यानंतर यादव यांनी तात्काळ अहमदनगरच्या अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळ संचलित मानव सेवा प्रकल्प,
आरणगाव यांना संपर्क साधून महिलेबाबत माहिती देत व्यवस्था केली.
त्यानंतर पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी दौंड पोलीस ठाण्याचे पो.काँ. रवींद्र काळे, पो.काँ. योगेश पाटील, महिला पो.कॉ.असीम शेख व महिला.पो.काँ. पल्लवी महाडिक यांच्या मदतीने महिलेस मोठ्या कष्टाने ताब्यात घेतले. आणि मानव सेवा प्रकल्प ग्रामविकास मंडळ येथे पाठवून संबंधित महिलेला संस्थेच्या ताब्यात दिले.आता या महिलेला या संस्थेचा आधार मिळाला असून तीच्या स्वच्छतेची, राहण्याची ,खाण्याची सोय होणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक यादव यांनी दिली. मनोरुग्ण महिलेचा नागरिकांना होणारा त्रासही बंद झाला आणि तीच्या राहण्याखाण्याची व्यवस्था झाल्याने इथल्या व्यापारी वर्गाने पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव व दौंड पोलिसांचे आभार मानले. दिलीप गुंजाळ यांचे मानव सेवा प्रकल्पात अशा निराधार ,बेवारस नागरिकांवर औषधोउपचार आणि मानसिक उपचार करून त्यांच्या नातेवाईकांचा शोध घेऊन त्यांच्या ताब्यात दिले जाते.
पोलीस अधीक्षक पंकज देशमुख ,अप्पर पोलीस अधीक्षक संजय जाधव, उपविभागीय पोलिस अधिकारी स्वप्निल जाधव यांचे मार्गदर्शनाखाली दौंडचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव पोलीस ठाण्याचे पो.काँ. रवींद्र काळे, पो.काँ. योगेश पाटील,संजय कोठावळे महिला पो.कॉ.असीम शेख व महिला.पो.काँ. पल्लवी महाडिक यांनी कारवाई केली.