अब्बास शेख
पुणे : पांढरेवाडी व जिरेगाव (ता. दौंड जि. पुणे) ही गावे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, (MIDC) फेज-२ झोन मध्ये समाविष्ट करण्याबाबतचा प्रस्ताव भूसंपादन अधिकारी क्र.०३ पुणे यांच्या कार्यालयाकडून भूसंपादन अधिकारी क्र.०३ यांची बनावट सही व कार्यालयाचा शिक्क्याचा वापर करुन खोडसाळपणे प्रसिद्ध करण्यात आल्याचे समोर आले आहे.
विशेष म्हणजे कार्यालयाचा जा.क्र.उपजि/भूसं3/कावि/४२१/२०२५, दि. २० जुलै २०२५ रोजीचे निवेदन अशा आशयाचे हे पत्र मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र औदयोगिक विकास महामंडळ, (मरोळ इंडल क्षेत्र, महाकाली लेणी रोड, अंधेरी (पूर्व), मुंबई-४०००९३) यांना पाठविल्याचे समाज माध्यमावरुन प्रसारीत केले जात आहे. मात्र हे पत्रच बनावट असल्याचे आता समोर आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अज्ञाताने भूसंपादन अधिकारी क्र.०३ पुणे यांच्या सही व शिक्क्याचे बनावट पत्र तयार करुन ते व्हायरल करत नागरीकांची दिशाभूल केली आहे. त्यामुळे बनावट पत्राबाबत या अज्ञाताविरुद्ध शासकीय कामात हस्तक्षेप, सही व शिक्क्याचा गैरवापर करुन नागरिकांमध्ये दिशाभूल करणारे वातावरण तयार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करुन कायदेशी कारवाई करणेबाबत बंडगार्डन पोलीस स्टेशन येथे फिर्याद दाखल करण्यात आली आहे.
तथाकथित निवेदन भूसंपादन क्र.०३ कडून देण्यात आले नसून ते पूर्णपणे खोडसाळ व बनावट असून नागरीकांनी अशा दिशाभूल करणाऱ्या पत्रापासून सतर्क रहावे, असे आवाहन उपजिल्हाधिकारी भूसंपादन क्र.०३ पुणेच्या डॉ. संगीता राजापूरकर-चौगुले यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.