अख्तर काझी
दौंड : शहरात दहीहंडी उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला. दौंड मध्ये एकूण सात मंडळांनी दहीहंडी उत्सवाचे आयोजन केले होते. या सर्व मंडळांच्या दहीहंडीस दौंडकारांनी उदंड प्रतिसाद देत व गोविंदा पथकांच्या मानवी मनोऱ्यांचा थरार अनुभवीत उत्सवाचा आनंद साजरा केला.
येथील गांधी चौकातील मानाची दहीहंडी असा नावलौकिक असलेल्या हिंदू एकता मंच व रुपेश कटारिया- शैलेंद्र पवार मित्र मंडळ आयोजित दहीहंडी उत्सवास यंदाही दौंडकरांनी चांगला प्रतिसाद दिला. यंदाचे अध्यक्ष रुपेश बंड यांनी उत्सवाच्या आयोजनाची जबाबदारी पार पाडली. इंदापूरच्या महात्मा फुले ग्रुपने ही मानाची दहीहंडी फोडून मानकरी संघाचा मान मिळवित 55 हजार 555/- रु. चे बक्षीस पटकाविले. आमदार राहुल कुल, मा. नगराध्यक्ष प्रेमसुख कटारिया,, आप्पासो पवार, नंदू पवार, प्रदीप मामा जगदाळे, डॉ. समीर कुलकर्णी आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
गांधी चौक, भाजी मंडई परिसरातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर प्रतिष्ठान व आकाश पलंगे मित्रपरिवार आयोजित दहीहंडी उत्सवही मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला. ही दहीहंडी फलटणच्या काळभैरव दहीहंडी संघाने फोडून 1लाख 11 हजार 111 रु चे बक्षीस जिंकले. यावेळी मा. नगराध्यक्ष इंद्रजीत जगदाळे ,अखिल भारतीय छावा संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष जीत मेहता, तुषार थोरात,मा. नगरसेवक बबलू कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते. कुरकुंभ मोरी परिसरातील झुंज मित्र मंडळ आयोजित दहीहंडी उत्सवासही चांगला प्रतिसाद मिळाला. यंदाचा दहीहंडी उत्सव राजेश मंथने यांच्या अध्यक्षते खाली पार पडला. इंदापूरच्या महात्मा फुले ग्रुपने ही दहीहंडी फोडून 22 हजार 222/- रु चे बक्षीस जिंकले.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश युवक आघाडीचे संघटक सतीश थोरात व कुस्ती सम्राट असलम काझी यांच्या हस्ते बक्षीस प्रदान करण्यात आले. आमदार राहुल कुल, मा. नगराध्यक्ष प्रेमसुख कटारिया यांनी मंडळास भेट देऊन उत्सवाच्या शुभेच्छा दिल्या. शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये अभिमन्यू मित्र मंडळ, दौंड नगरपालिकेसमोर आनंद पळसे मित्र मंडळ, शालिमार चौकामध्ये विकी सरवदे मित्र मंडळ व गजानन सोसायटी परिसरामध्ये स्वप्निल ठाणगे मित्र मंडळाच्या वतीने दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले.
या मंडळांच्या दहीहंड्या महात्मा फुले ग्रुप व काळभैरव दहीहंडी संघाने फोडून मानकरी संघाचा मान मिळविला. राष्ट्रवादी काँग्रेस( अजित पवार गट) पक्षाच्या पदाधिकारी वैशाली नागवडे यांनीही शहरात दहीहंडी उत्सव आयोजित करणाऱ्या मंडळास भेट देऊन दहीहंडी उत्सवाच्या शुभेच्छा दिल्या.