अब्बास शेख
पुणे : बारामती लोकसभा मतदार संघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी फेसबुकवर एक पोस्ट केली असून यामध्ये महाराष्ट्र शासनाकडून दिवाळी निमित्त गोरगरीब जनतेला देण्यात आलेला आनंदाचा शिधा हा निकृष्ट दर्जाचा असल्याचा दावा त्यांनी केला आहे. हा दावा करताना त्यांनी याचा निषेध करत ‘आनंदाचा शिधा’ मधील किडे लागलेल्या डाळी व इतर वस्तूंचे फोटो शेअर केले आहेत. शेअर केलेल्या फोटोमध्ये या वस्तू निकृष्ट दर्जाच्या असल्याचे दिसत आहे.
सदर प्रकाराबाबत खासदार सुप्रिया सुळे यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये लिहिताना, गोरगरीब जनतेला दिवाळी सणासाठी दिला गेलेला ‘आनंदाचा शिधा’ हा खाण्यास अयोग्य असल्याचे निदर्शनास आले आहे. डाळींमध्ये किडे, रव्यामध्ये जाळ्या, निकृष्ट दर्जाचे पामतेल अशा पद्धतीचे साहित्य वाटण्यात आले. हि गोरगरीब जनतेची शासनाने केलेली क्रूर अशी थट्टा आहे. गोरगरीबांच्या दिवाळीची अशी थट्टा करणाऱ्या शासनाचा तीव्र निषेध. असे म्हणत त्यांनी आपली पोस्ट CMOMaharashtra ला टॅग केली आहे.
दिवाळीच्या सनामध्ये गोरगरिबांची दिवाळी गोड व्हावी म्हणून शासनाकडून आनंदाचा शिधा अत्यल्प किंमतीमध्ये राज्यातील जनतेला उपलब्ध करून देण्यात आला आहे. यामध्ये डाळी, रवा, तेल अश्या विविध वस्तू अत्यंत माफक दरात देण्यात आल्या आहेत. मात्र शासनाकडून देण्यात आलेल्या या वस्तू निकृष्ट दर्जाच्या असल्याची पोस्ट खासदार सुप्रिया सुळे यांनी केल्याने खळबळ माजली आहे.