सुधीर गोखले
सांगली : या धकाधकीच्या जीवनात आपल्याला आपल्या जन्म गावी आयुष्यभर बांधील राहणं खूप अवघड होऊन बसलं आहे. व्यवसाय उद्योगाच्या निमित्ताने आपला गाव आपली माणसं आपलं घर सोडून गेल्यानंतर बालपणीचा काळ खरंतर केवळ स्मरणात जिवंत राहतो.
मुलींच्या आयुष्यात तर अमुलाग्र बदल घडतात. इतकेच काय तर विवाहानंतर त्यांचे नाव देखील बदलून जाते. असेच काहीसे प्रत्येकाच्या बाबतीत घडते. पण उत्तम नियोजन केले, आणि मनाचाही हिय्या केला तर एकमेकांपासून दुरावलेली नाती जवळ येऊ शकतात हे या निमित्ताने सिद्ध झाले. निमित्त होते ‘अतीत रंजन’ मेळाव्याचे. हिज हायनेस राजा चिंतामणराव पटवर्धन हायस्कूल , सांगलीच्या १९६८ साली अकरावी मॅट्रिक पास झालेल्या विद्यार्थ्यांच्या स्नेह मेळाव्याचे. रविवार दिनांक 25 जून 2023 रोजी हा सोहळा शाळेच्या मैदानावर अतिशय उत्साहात संपन्न झाला. या मेळाव्यास तब्बल 65 विद्यार्थी उपस्थित होते. मुलींची संख्याही कमी नव्हती. केवळ मुलेच उपस्थित होती असे नव्हे तर त्यांना शिकवणारे दोन शिक्षक आवर्जून विद्यार्थ्यांना आशीर्वाद देण्यासाठी आले होते.
श्री. रंगनाथ धारवाडकर व श्री. विष्णुपंत म्हसकर हे दोन गुरुवर्य वयाच्या नव्वदीतही उत्तम आरोग्य राखून आहेत. कार्यक्रमाची सुरुवात संस्थापक प्रतिमा पूजन व सरस्वती पूजनाने झाली. डॉ. दिलीप पटवर्धन यांचे ‘सत्तरीनंतरचे जीवनक्रमण’ या विषयावर मार्गदर्शन पर व्याख्यान झाले. गुरुवर्यांचे सत्कार संपन्न झाले. या बॅचमधील अतुलनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. लवकरच शाळेत सौर ऊर्जेचा वापर करण्यास सुरुवात व्हावी, या उदात्त उद्देशाने या विद्यार्थ्यांनी शाळेला काही रक्कम देणगी रूपाने देऊ केली. तब्बल 55 वर्षांच्या कालावधीनंतर लांबलांबून विद्यार्थी एकत्रित आल्यामुळे सर्वांच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहत होता. प्रत्येकाला निरखून पाहून ओळखण्याचा खेळ जणू चालला होता. या मुलांनी इयत्ता अकरावी असताना लिहिलेले आम्ही नावाचं हस्तलिखित शाळेने आजही मोठ्या प्रेमाने जपून ठेवले आहे. ते पुन्हा नजरेखालून घालताना या मुला मुलींचे डोळे अक्षरश: डबडबले.
स्त्री-पुरुषात वागा-बोलण्यात निसर्गतः असणारी भिंत आता कोलमडून पडली होती. मुलं मुली निर्व्याज प्रेमाने एकमेकांशी गप्पा मारत होत्या. कार्यक्रम ऑनलाईनदेखील उपलब्ध असल्याने अनेकांनी व्हर्च्युअली उपस्थित राहून कार्यक्रमात सहभागी झाले. एकूणच सोहळा फार रंगतदार झाला होता. तब्बल 55 वर्षांनी ते पुन्हा मुलं मुली या नावाने स्वतःला संबोधून घेत होते. वयाच्या ज्येष्ठत्वाचे सारे बांध वाहून गेले होते. कार्यक्रम संपताना सर्वांनी एकमेकांचा भावनिक होवून निरोप घेतला. जाताना प्रत्येकजण पुनर्मिलामः चे आश्वासन देत घराकडे वळला. या अत्यंत विलक्षण भेटीसाठी श्री. विवेक सरलाय, श्रीराम कानिटकर, प्राची गोडबोले, श्रीकृष्ण शिंदे, हेमंत शहा, विजय वाळुजकर, उज्ज्वल तिळवे, विश्वास दाते यांनी यशस्वीपणे संयोजन केले.