दरोड्यातील फरार आरोपी दौंड पोलिसांकडून जेरबंद

दौंड : दरोडा प्रकरणातील फरारी आरोपी युवराज सुभाष थोरात (वय 25,रा. नॉनवीज) याच्या दौंड पोलिसांनी नाट्यमयरीत्या मुसक्या आवळल्या आहेत.

दौंड पोलीस स्टेशन वाहतूक शाखेतील पोलीस कर्मचारी येथील उड्डाणपूल परिसरात गस्तीवर होते. त्यावेळी वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर वाहतूक पोलिसांकडून कारवाई चालू असताना त्यांना फरार आरोपी युवराज थोरात हा नजरेस पडला. पोलिसांची आपल्यावरील नजर लक्षात येताच त्याने तेथून पळ काढण्याचा प्रयत्न केला परंतु पो. कर्मचारी शेखर झाडबुके व ट्रॅफिक वॉर्डन आकाश शिंदे यांनी त्याचा पाठलाग करून त्याला अखेर जेरबंद केले.

पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली पो. उपनिरीक्षक आबनावे, हेमंत भोंगळे, शेखर झाडबुके, आकाश शिंदे यांनी सदरची कामगिरी बजाविली.