अब्बास शेख
केडगाव : जिल्हापरिषद आणि पंचायत समितीची निवडणूक जाहिर झाल्यानंतर दिग्गजांसह सर्वसामान्य जनतेचे सर्वात जास्त लक्ष हे दौंड तालुक्यातील बोरिपार्धी – केडगाव गटाकडे लागले आहे. या गटामध्ये माजी आमदार रमेश थोरात यांच्या गटाकडून त्यांचे पुत्र तुषार (गणेश) थोरात यांचे नाव आघाडीवर असून विद्यमान आमदार राहुल कुल यांच्या गटाकडून सहकार महर्षी माजी आमदार कै.काकासाहेब थोरात यांचे नातू आणि भीमा पाटस चे माजी उपाध्यक्ष आनंद थोरात यांचे चिरंजीव आणि बोरिपार्धी ग्रामपंचायत चे सदस्य अभिषेक थोरात यांचे नाव आघाडीवर आहे.

बोरिपार्धी जिल्हा परिषद गटामध्ये खुटबाव, एकेरीवाडी, केडगाव, बोरिपार्धी, पडवी, देऊळगाव गाडा आणि खोर या गावांचा समावेश आहे. या गावांमध्ये तुषार थोरात यांना खुटबाव येथे चांगले मताधिक्य आणि केडगावमध्ये थोडेफार मताधिक्य किंवा बरोबरीत सुटेल तर पडवी येथे तिहेरी लढत होण्याची शक्यता असल्याने येथेही तुषार थोरात बरोबरीत राहतील असे मत जानकार व्यक्त करत असून एकेरीवाडी संमिश्र, तर बोरिपार्धी, देऊळगाव गाडा, खोर या गावांमध्ये अभिषेक आनंद थोरात यांचा प्रभाव जास्त राहील असे मत राजकीय जानकार व्यक्त करत असल्याने ही निवडणूक अत्यंत चूरशीची होईल असे बोलले जात आहे.
निवडणूक गट रचना आणि आरक्षण जाहीर झाल्यानंतर माजी आमदार रमेश थोरात यांच्या गटाने मोठा जल्लोष करत तुषार थोरात यांचे स्टेटस ठेऊन ते आत्ताच निवडून आले असा विश्वास व्यक्त केला होता मात्र त्यानंतर कुल गटाकडून अभिषेक थोरात आणि राहुल हंडाळ यांची नावे पुढे येऊ लागल्याने ही निवडणूक वाटते तितकी सोपी नाही हेही थोरात गटाला कळून आले. सध्या परिस्थितीमध्ये तुषार थोरात यांच्या विरोधात कुल गटाकडून अभिषेक थोरात यांचे नाव आघाडीवर असून त्यांना राहुल हंडाळ यांसह कुल गटाच्या अन्य इच्छुक उमेदवारांनीही साथ देण्याची तयारी दर्शविल्याने रमेश थोरात यांच्या गटाने मोर्चे बांधणी सुरु केली आहे.
पंचायत समितीसाठी थोरात गटातून इच्छुकांची गर्दी वाढली : केडगाव – खुटबाव गणातून माजी आमदार रमेश थोरात गटातील इच्छुक उमेदवारांची यादी दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसत आहे. सध्या या गणात संताजी उर्फ मनोज शेळके यांचे नाव आघाडीवर असून त्यानंतर धनंजय (बापू) शेळके यांचे नाव प्रामुख्याने पुढे येताना दिसत आहे. त्यानंतर भानुदास देशमुख, धोंडिबा शेळके, पाराजी हंडाळ, दिलीप हंडाळ, सचिन शेळके यांचीही नावे इच्छुक म्हणून पुढे येत आहेत.
तर विद्यमान आमदार राहूल कुल यांच्या गटाकडून प्रकाश देशमुख, मनोज होळकर, दिग्विजय देशमुख, शिवाजी उर्फ बंडू शेळके यांची नावे इच्छुक म्हणून समोर येत आहेत.
एकंदरीतच बोरिपार्धी – केडगाव गटाची निवडणूक अत्यंत चूरशीची होणार असल्याचे संकेत मिळत असून केडगाव – खुटबाव गणात खुटबाव चे लीड मिळणार असल्याने मा.आ. रमेश थोरात गटात गणातील इच्छुकांनी कंबर कसली आहे.







