जळगाव : जळगाव रेल्वे अपघातामध्ये आत्तापर्यंत १२ रेल्वे प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे. यात नऊ पुरुष आणि तीन महिलांचा समावेश आहे. पुष्पक एक्स्प्रेसमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये रेल्वेमध्ये आग लागल्याची अफवा पसरली आणि त्यानंतर या प्रवाशांनी भीतीने ट्रेनमधून बाहेर उड्या मारल्या मात्र याच वेळी समोरुन येणाऱ्या बंगळुरु एक्स्प्रेसखाली हे प्रवाशी आल्याने ते चिरडले गेले.
प्रशासनाकडून या संपूर्ण घटनेची माहिती मिळवली जात असून काही प्रत्यक्षदर्शी प्रवाशांनी दिलेल्या माहितीनुसार, पुष्पक एक्स्प्रेस जळगाववरून येत असताना अचानक कुणीतरी रेल्वेला आग लागल्याचे म्हणाले. आग लागली असल्याचे समजताच रेल्वेतील काही प्रवाशांनी रेल्वे बाहेर उड्या मारून जीव वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचवेळी समोरुन येत असलेल्या बंगळुरु एक्सप्रेस खाली हे सर्वजण चिरडले गेले अशी माहिती त्यांनी दिली.
जळगाव वरून पुष्पक एक्सप्रेस निघाली होती, परांडा या स्थानकाजवळ ट्रेन आली असता ब्रेक दाबल्यानंतर घर्षण झालं आणि काही ठिणग्या उडाल्या. या पाहून एका प्रवाशाने आग लागल्याचे अन्य लोकांना सांगितले. यामुळे रेल्वेतील ३५ ते ४० प्रवाशांनी ट्रेनमधून उड्या मारल्या. मात्र, त्याचवेळी दुसऱ्या बाजूने येणाऱ्या बंगळुरु एक्सप्रेसने काही प्रवाशांना चिरडलं. या अपघातात १२ प्रवासी ठार झाले असून अन्य काही जखमी झाले आहेत.