स्वातंत्र्यदिन विशेष : 77 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की संपूर्ण देश मणिपूरच्या जनतेबरोबर आहे. तेथील समस्या शांततेच्या मार्गाने सुटतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
मणिपूरमध्ये अशांतता आणि हिंसाचार सुरु आहे आणि महिलांच्या प्रतिष्ठेवर हल्ला झाल्याच्या बातम्या येत आहेत असे ते म्हणाले. मणिपूरचे लोक काही काळ शांतता राखत आहेत आणि शांततेची प्रक्रिया पुढे सुरु रहावी असे त्यांनाही वाटत असलयाचे त्यांनी नमूद केले. “तिथल्या समस्या सोडवण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकार एकत्रितपणे काम करत आहेत आणि यापुढेही करत राहतील” असे ते म्हणाले.
स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून देशातील 140 कोटी ‘परिवारजना’ (कुटुंबातील सदस्यांना) शुभेच्छा दिल्या आणि देशावरील पराकोटीच्या विश्वासाची दखल घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने लाल किल्ल्यावर आयोजित सोहळ्यात जनतेला संबोधताना सविस्तर भाषण केलं. यावेळी मोदींनी त्यांच्या सरकारच्या १० वर्षांच्या कार्यकाळात कोणत्या योजना राबवल्या, त्याचा फायदा जनतेला कशा प्रकारे झाला आणि देशाची अर्थव्यवस्था दहाव्या क्रमांकावरून पाचव्या क्रमांकावर कशी आली याविषयी उल्लेख केले.
आम्ही जेव्हा २०१४ मध्ये सत्तेत आलो, तेव्हा आपण जगात दहावी अर्थव्यवस्था होतो. आज आपण जगात पाचव्या स्थानी पोहोचलो आहोत. जेव्हा भ्रष्टाचाराचा राक्षस देशाच्या मानगुटीवर बसला होता, लाखो कोटींचे घोटाळे अर्थव्यवस्थेला हादरे देत होते, प्रशासकीय दिरंगाई देशाची ओळख झाली होती. आम्ही अर्थव्यवस्था सक्षम केली. गरीबांसाठी चांगल्या योजना आणल्या”, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या भाषणात म्हणाले. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात सहभागी झालेल्या प्रत्येक महान व्यक्तीला मोदी यांनी वंदन केले. महात्मा गांधींच्या नेतृत्वाखालील असहकार आंदोलन आणि सत्याग्रह चळवळ तसेच भगतसिंग- सुखदेव-राजगुरू आणि असंख्य शूरवीरांच्या बलिदानाचे स्मरण करून देताना ते म्हणाले की त्या पिढीतील जवळपास प्रत्येकाने स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतला होता.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. अमृत काळात भारताला विकसित राष्ट्र बनवण्याचा संकल्प अधिक बळकट करण्याचे त्यांनी आवाहन केले.
“तुम्हा सर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या अनेक अनेक शुभेच्छा. चला, या ऐतिहासिक प्रसंगी अमृत काळात भारताला विकसित राष्ट्र बनवण्याचा संकल्प अधिक बळकट करूया. जय हिंद !
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आपल्या महान स्वातंत्र्यसैनिकांना आपण आदरांजली वाहतो आणि त्यांचे स्वप्न साकारण्याप्रती आपल्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार करतो. जय हिंद!” अश्या पद्धतीने त्यांनी ट्विट करत देश वासीयांना शुभेच्छा दिल्या.