दौंड : सहकारनामा ऑनलाइन (अख्तर काझी)
दौंड शहरातील गांधी चौक परिसरातील एका इमारतीसमोर उभ्या असलेल्या चार चाकी (मारुती,ओमीनी) वाहनाने अचानक पेट घेतल्याने स्थानिकांची चांगलीच धावपळ उडाली.
या परिसरात काही वेळ भीतीचे वातावरणही होते, परंतु घटना रात्री 9.30 वा. दरम्यान घडल्याने परिसरातील दुकाने बंद होती तसेच लागलेली आग स्थानिकांनी पुढाकार घेत लागलीच आटोक्यात आणल्याने मोठी दुर्घटना टळली आहे.
मात्र या आगीत गाडी पूर्णपणे जळाल्याने गाडीमालकाचे आर्थिक नुकसान झाले आहे. या गाडीमध्ये गॅस किटचा वापर केला जात होता का किंवा अन्य काही कारण आहे याचा शोध घेतला जात असून गाडी सुरू करताच गाडीने पेट घेतला, वाऱ्यामुळे आग जास्त पसरली व संपूर्ण गाडीच आगीच्या भक्ष्यस्थानी सापडल्याचे नागरिकांनी पाहिले.
आगीचा धूर व ज्वाला उंचीपर्यंत जात होत्या, व आग लागलेल्या गाडीच्या वरच विद्युत प्रवाहाच्या तारा असल्याने आणखीन काही अनर्थ घटना घडू नये म्हणून स्थानिकांनी महावितरण कार्यालयाला फोन करून विद्युत प्रवाह बंद करण्यास सांगितल्याने तात्काळ परिसरातील लाईट बंद करण्यात आली. त्यामुळे मोठा धोका टळला. दरम्यान उपस्थित स्थानिक युवकांनी पेटलेल्या गाडीवर पाण्याचा मारा करीत आग आटोक्यात आणली.
तोपर्यंत नगरपालिकेचा अग्निशामक बंब सुद्धा घटनास्थळी पोहोचला, त्यावरील कर्मचाऱ्यांनी पेट घेतलेल्या गाडीवर व आसपासच्या घरांवर पाण्याची फवारणी करून परिस्थिती नियंत्रणात आणली. घटनेनंतर गाडी मालक व परिसरातील नागरिकांमध्ये वादावादी झाल्याने नागरिकांनी बेजबाबदार पणे वागणाऱ्या गाडी मालका विरोधात दौंड पोलिसांकडे रात्री उशिरा तक्रार केली असल्याची माहिती मिळत आहे.