मुंबई : दिल्लीतील महाराष्ट्र सदनात क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले आणि पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे पुतळे हटविण्यात आल्याने राजकीय वर्तुळात संतप्त प्रतिक्रिया उमटायला सुरुवात झाली आहे.
खासदार सुप्रिया सुळे यांनी या संपूर्ण घटनेवर टीका करताना, बहुजन उद्धार व स्त्रीशिक्षण यांच्यासाठी आयुष्य वेचणाऱ्या सावित्रीमाई आणि आम्हा सर्वांसाठी परम वंदनीय असणाऱ्या कुशल प्रशासक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे पुतळे हटविण्याची घटना अतिशय दुर्दैवी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या भावना दुखावणारी आहे. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना हे मान्य आहे का? असा सवाल उपस्थित करत महाराष्ट्राचा पुरोगामी चेहरा पुसण्याचा प्रयत्न करणाऱ्या या घटनेला त्यांचे समर्थन आहे का? हे त्यांनी स्पष्ट करण्याची गरज असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
अशीच काहीशी संतप्त प्रतिक्रिया आमदार रोहित पवार यांनी दिली असून महाराष्ट्र सदनात सावरकरांची जयंती साजरी करण्यासाठी न्यायाची स्थापना करणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आणि महिला शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले या दोन्ही विश्वव्यापी कर्तृत्वांचे पुतळे हटवून अपमान करणे महाराष्ट्र शासनास शोभणारे नाही. हे करत असताना सर्वसामान्यांचा अभिमान असणारी महाराष्ट्र शासनाची मुद्रा झाकली जात आहे. याचे भान देखील सरकारला राहिले नाही. नेहमी गोंधळ घालणारे बोलघेवडे आता गप्प का? असा सवाल त्यांनी उपास्थित करत, या घटनेचा निषेध करण्याची हिम्मत ते दाखवतील का? असा उपरोधक टोलाही त्यांनी सत्ताधाऱ्यांना लगावला आहे.
महाराष्ट्र सदनात झालेल्या या घटनेमुळे राजकीय वर्तुळात संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या असून आता सरकारकडून याबाबत काय प्रतिक्रिया येते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.