मुळशीत 19 मुलींचा विनयभंग करणाऱ्या शिक्षक जालिंदर कांबळेच्या दौंड तालुक्यातही उचापती

दौंड : मागील काही दिवसांपासून महिला, अल्पवयीन मुलींशी संबधित अत्याचार आणि वियभंगाच्या घटनांनी संपूर्ण राज्य हादरले आहे. हे होत असताना पुणे जिल्ह्यातून आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका शिक्षकाने जिल्ह्यातील आंदगाव या शाळेत शिकणाऱ्या 19 अल्पवयीन विद्यार्थीनींचा विनयभंग केल्याची घटना उघडकीस आली आहे.

ही घटना मुळशी तालुक्यातील आंदगाव येथील असून या शाळेतील शिक्षकाने तब्बल 19 विद्यार्थिनींचा विनयभंग केल्याची ही धक्कादायक घटना असून या प्रकरणी पौड पोलिसांनी शाळेचा उपशिक्षक जालिंदर नामदेव कांबळे याला अटक केली आहे. जालिंदर कांबळे हा या अगोदर दौंड तालुक्यातील यवत येथे शिक्षक म्हणून कामास होता तेथेही या शिक्षकाचे विचित्र प्रताप ग्रामस्थांना खटकले होते अशी चर्चा आता दौंड तालुक्यात होताना दिसत आहे.

आंदगाव येथील शाळेत जालिंदर कांबळे हा शिक्षक विद्यार्थिनींना शिकवताना अश्लिल भाषेत बोलतो, मारहाण करतो अशी माहिती शाळा व्यवस्थापनाला मिळाली होती. त्यानुसार गुरूवारी संस्थेच्या कार्यकारिणी समितीमधील सदस्य शाळेत चौकशीसाठी गेले होते.

त्यावेळी 19 विद्यार्थिनींनी कांबळे याच्या विरुद्ध लेखी अर्ज दिला होता. त्यानंतर शाळेकडून पोलिसांना तक्रार देण्यात आली.
उप शिक्षक कांबळे हा मुलींशी लगट करायचा, फळ्यावर मुका, पप्पी असे अश्लिल शब्द लिहायचा. त्याने शाळेतील एका मुलीच्या डोळ्याला पट्टी बांधून तिला थेट मिठी मारली होती. मात्र त्यावेळी इतर विद्यार्थिनी ओरडल्याने त्याने तिला सोडले होते. तो वर्गामध्ये विद्यार्थिनींच्या जवळ जात असे, त्यांच्या कानात बोलायचा आणि ओरडायचा.

शाळेतील मुलींच्या हाताला स्पर्श करून त्यांच्या डोक्यावर आपले डोके आपटायचा, मुलींनी त्यास विरोध केला तर तो त्यांना मारहाण करायचा असे तक्रारीत म्हटले आहे.
अश्लील चाळे करणाऱ्या आणि विध्यार्थिनींचा विनयभंग करणाऱ्या जालिंदर कांबळे याच्या विरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्यास अटक केली आहे.