दौंड : पुणे सोलापूर महामार्गावरील सहजपूर (ता.दौंड) येथे असणाऱ्या मारुती कंपनीच्या शोरुममधून चोरट्यांनी एक स्विफ्ट कार आणि 1 लाख 2 हजार 400 रुपयांची रोकड चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. ही घटना दि.11 जून रोजी पहाटे 3:15 च्या सुमारास घडली असून याबाबत अनिल साहेबराव बोडके (व्यवसाय नोकरी, रा.यवत ता.दौंड) यांनी फिर्याद दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार पुणे सोलापूर हायवेवरील सहजपूर येथे असणाऱ्या महालक्ष्मी ऑटोमोटिव्ह या शोरूममध्ये कामासाठी आलेली 4 लाख रुपये किंमतीची पांढऱ्या रंगाची 2013 मॉडेल असलेली स्विफ्ट कार नं. (एम एच 12 के इ 4555) व शोरूममध्ये असणाऱ्या कॅश टेबलमधील 1 लाख 2 हजार 400 रुपयांची रोकड असा एकुण 5 लाख 2 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला.
काही दिवसांपूर्वी असाच एक प्रकार पुणे सोलापूर हायवेवरील सोरतापवाडी येथील जुन्या वाहनांच्या शोरूममध्ये घडला होता. ज्यामध्ये सुरक्षा रक्षकाच्या डोक्याला पिस्तूल लावून अज्ञात चोरट्यांनी तेथील स्विफ्ट डिझायर कार चोरून नेली होती. आज पुन्हा एकदा असाच वाहन चोरीचा प्रकार घडला असल्याने वाहन खरेदी विक्री करणाऱ्या डीलर्समध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
चोरीची घटना उघडकीस आल्यानंतर शिरूरचे एस.डी.पी.ओ. गवारी तसेच यवतचे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे, पोसई मदणे यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली. या घटनेचा अधिक तपास पोना शिंदे हे करीत आहेत.