भावी खासदार बनू पाहणाऱ्या सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार यांना ‘ओबीसी पर्व’ चे मोठे आव्हान ! आकडेवारी पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या

सहकारनामा – अब्बास शेख

राजकीय वार्तापत्र : संपूर्ण देशात लोकसभा निवडणुकीची तयारी सुरु झाली असताना संपूर्ण राज्याचं लक्ष मात्र बारामती लोकसभा मतदार संघाकडे लागलं आहे. बारामती लोकसभा मतदार संघ हा भाजप ने मोस्ट वॉन्टेड लिस्टमध्ये टाकला असल्याने येथे सुप्रिया सुळे यांना महायुतीच्या सुनेत्रा पवार यांचं मोठं आव्हान असणार आहे. या दोघांच्या भांडणात आता तिसऱ्या मोठ्या शक्तीने शिरकाव केला आहे आणि ही शक्ती आहे माळी, धनगर आणि इतर ओबीसी बांधव मिळून बनलेल्या ‘ओबीसी पर्व’ एकतेची. ओबीसी पर्वा तर्फे विविध नावांची चाचपणी सुरु असताना यात प्रामुख्याने महेश भागवत यांचे नाव पुढे येत आहे. या पर्वात फक्त ओबीसी बांधव सामिल न होता इतरही जाती, धर्माचे लोक प्रस्थापितांच्या विरोधात सामिल होत असल्याने वर्षानुवर्षे सत्ता मुठीत ठेवणाऱ्या प्रस्थापितांना मोठा झटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

२०१४ साली महादेव जानकरांनी उभे केले होते मोठे आव्हान.. २०१४ सालच्या लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे विरुद्ध महादेव जानकर असा सामना रंगला होता. यामध्ये सुप्रिया सुळे यांना ५,२१,५६२ तर महादेव जानकर यांना ४,५१,८४३ इतकी मते पडली होती. या निवडणुकीत सुरेश खोपडे यांना २६,३९६ २४,९०८ तात्यासाहेब टेळे ८,८११ आणि नोटा ला १४,२१६ इतकी मते मिळाली होती. या निवडणुकीत महादेव जानकर यांचा अवघ्या ६९,७१९ मतांनी पराभव झाला होता. वरील आकडेवारी पाहता त्यावेळी ओबीसी फॅक्टर हा कार्यान्वित नव्हता आणि बहुसंख्य मुस्लिमांचा कल हा राष्ट्रवादीच्या बाजूने राहिला होता यावेळी मात्र परिस्थिती वेगळी आहे त्यामुळे सुळे, पवार यांच्यासमोर ओबीसी पर्वाचे मोठे आव्हान उभे राहणार असल्याचे दिसत आहे.

बारामती लोकसभा मतदार संघातील विधानसभा मतदार संघ

बारामती लोकसभा मतदार संघामध्ये सहा विधानसभा मतदार संघ येत असून त्यामध्ये दौंड, इंदापूर, बारामती, पुरंदर, भोर आणि खडकवासला या सहा विधानसभा मतदार संघांचा समावेश आहे.

ओबीसी पर्वाच्या बैठकांना सुरुवात सध्या सुरु झालेल्या ओबीसी पर्वाच्या बैठकांमध्ये अनेक सर्वसामान्य लोक आपले विचार मांडत असून सुळे, पवार यांच्यात जिंकून कुणीही आले तरी सत्ता मात्र पुन्हा एकदा एकाच घरात राहणार ना असा प्रश्न त्यांच्याकडून उपस्थित केला जाऊ लागला आहे. त्यामुळे प्रस्थापितांना शह देण्यासाठी आता ओबीसी पर्व कंबर कसत असल्याचे दिसत आहे. दौंड तालुक्यातील केडगाव पासून सुरु झालेला ओबीसी फॅक्टर हा संपूर्ण राज्यात पोहोचला आहे. मंत्री छगन भुजबळ यांनी आपल्या अनेक भाषनांमध्ये आणि वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये ओबीसी पर्वाची स्तुती केली होती. हाच ओबीसी फॅक्टर आत्ताच्या लोकसभेला मोठे आव्हान उभे करू शकतो हे आकडेवारीतून स्पष्ट होताना दिसत आहे.
खालील आकडेवारी ही ओबीसी पर्वाला बळ देणारी ठरणार आहे त्यामुळे प्रस्थापितांना यामुळे धक्का बसण्याचीही शक्यता वर्तविण्यात येत आहे.

भुवया उंचावणारी मतदारांची आकडेवारी सध्याच्या बारामती लोकसभा मतदार संघाची आकडेवारी ही मराठा समाज ६ लाखाच्या आसपास, ओबीसी समाज ८ लाख ७५ हजारांच्या आसपास, मागासवर्गीय आदिवासी हे ४ लाख २५ हजारांच्या आसपास, मुस्लिम
१ लाख २५ हजारांच्या आसपास, ख्रिश्चन ४० हजारांच्या आसपास तर ब्राम्हण, मारवाडी, जैन समाज १ लाख ५० हजारांच्या आसपास असल्याचे दिसत आहे. वरील आकडेवारीवरून ओबीसी पर्व हे सध्याच्या लोकसभा निवडणुकीत मोठे आव्हान उभे करू शकते अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

सुप्रिया सुळेंनी तळ ठोकून दौरे वाढवले.. तर सुनेत्रा पवारही अ‍ॅक्टिव्ह  परिस्थितीचा आढावा घेऊन बारामती लोकसभा मतदार संघात सुप्रिया सुळे यांनी तळ ठोकला आहे. विविध तालुक्यांमध्ये त्यांनी आपले दौरे सुरु केले आहेत. सोशल मीडियावरूनही त्यांनी चिन्हाचा प्रचार सुरु केला आहे. त्यांच्या विरोधात अजित पवारांच्या पत्नी आणि सुप्रिया सुळे यांच्या वहिनी सुनेत्रा पवार उभ्या राहणार असल्याचं आता स्पष्ट झालं आहे. या ठिकाणी सुनेत्रा पवार अ‍ॅक्टिव्ह झाल्या असून अजित पवारांचे कार्यकर्तेही या ठिकाणी कामाला लागले आहेत. त्यांनी फिरते टेम्पो आणि सोशल मीडियावर आत्तापासूनच वातावरण निर्मिती करण्यास सुरुवात केली  आहे. काही दिवसांपूर्वी अजित पवारांनी आपल्या भाषणात बोलताना इतकी वर्ष वरिष्ठांचं ऐकलं, आता माझं ऐका. शेवटची निवडणूक आहे, असं सांगून ते भावनिक करतील मात्र विकासकामे करायची असतील, तर माझ्या विचाराच्या उमेदवाराला निवडून द्या असे विधान करून त्यांनी आपण पूर्ण ताकदीनीशी ही निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले होते.
बारामती लोकसभा मतदार संघाच्या विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांनीही अजित पवारांचे आव्हान स्वीकारून विविध तालुक्यांमध्ये आपले दौरे वाढवले आहेत. त्यांनी वयक्तीतपणे गावागावांतील महत्वाच्या लोकांना प्रत्यक्ष भेटून आणि फोनवरून संपर्क साधण्यास सुरुवात केली आहे. तब्बल तीन टर्म खासदार राहिलेल्या सुप्रिया सुळे यांना काही ठिकाणी जनतेकडून प्रश्नही विचारण्यात येत आहेत. तर ओबीसी पर्वाने आपली रणनीती आखण्यास सुरुवात केली असून यावेळी ते मोठा करिष्मा करून दाखविण्याच्या तयारीत मैदानात उतरणार असल्याचे त्यांनी स्पष्ट संकेत दिले आहेत.

बारामती लोकसभा मतदार संघाच्या पुढील राजकीय पटलावरील घडामोडी लवकरच..