पाटस : एम.आर.एन. भीमा शुगर & पॉवर प्रा.लि (निराणी शुगर्स लि.), पाटस, ता.दौंड या कारखान्याच्या गाळप हंगाम – 2025-26 करिता येणाऱ्या प्रति टन उसाला ₹ 3100/- पहिला हप्ता दिलेला आहे.
आता दि 16 जानेवारीनंतर गाळपास येणाऱ्या उसाला प्रति टन ₹ 200/- अतिरिक्त अनुदान, म्हणजेच दि. 16 जानेवारीनंतर गाळपास येणाऱ्या उसाला प्रति टन ₹ 3300/- ऊस दर देणार असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष आमदार ऍड राहुल कुल यांनी दिली आहे. हंगाम 2025-26 करिता आलेल्या उसाचा अंतिम दर दौंड तालुक्यातील इतर कारखान्यांच्या बरोबरीने देणार असल्याचे ऍड राहुल कुल यांनी आश्वस्त केले आहे.

कारखान्याने दि. 12 जानेवारीपर्यंत ५४०८४८ मे.टन ऊस गाळप केले असून, ५३१०५०क्विंटल साखर उत्पादीत केली आहे. कारखान्याचा सरासरी साखर उतारा ११.३४% राखला आहे. कारखान्याच्या डिस्टीलरी प्रकल्पतून आतापर्यंत ८८४८६३ लिटर उच्च प्रतीचे इथेनॉल उत्पादीत केले असून २६७७३२१ लिटर रिक्टिफाईड स्पिरिट उत्पादीत केले आहे.
सहवीज निर्मिती प्रकल्पतून आज अखेरीस २१७५९५३७ युनिट्स वीज निर्मिती केली असून १६७५८२३७ युनिट्स स्ववापर करून ५१८२२०० वीज निर्यात केली आहे. या वर्षी कारखान्याच्या इतिहासात प्रथमच एका दिवसात 11,000 मे.टन ऊस गाळप केले असल्याचे एमआरएन भीमाचे कार्यकारी संचालक रविकांत पाटील यांनी दिली आणि त्याच बरोबर कारखान्याच्या सभासदांनी आपल्या हक्काच्या कारखान्याला जास्तीत जास्त ऊस देऊन सहकार्य करावे असे आवाहन रविकांत पाटील यांनी केले.
कारखान्याला ऊस पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांचे, कारखान्यातील सर्व अधिकारी, कर्मचारी आणि युनियन पदाधिकाऱ्यांचे निराणी ग्रुप्स चे अध्यक्ष श्री मुरुगेश निराणी, एक्झिक्युटीव्ह डायरेकटर श्री संगमेश निराणी, ग्रुपचे कार्यकारी संचालक श्री विजय निराणी संचालक श्री विशाल निराणी यांनी आभार मानले.







