वाखारी गावच्या विद्यार्थिनींचा शिक्षणासाठी जीव मुठीत घेऊन प्रवास

अब्बास शेख

दौंड : दौंड तालुक्यातील वाखारी गावच्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. पुणे सोलापूर महामार्गावर भरधावपणे येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांना चुकवून त्यांना रस्ता ओलांडावा लागत असल्याने पालक वर्गात कायम चिंतेचे वातावरण पहायला मिळते.

वाखारी येथे भिषण अपघात, तिघांना चिरडले

त्यामुळे वाखारी गाव आणि वाकडापुल असा प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पुणे सोलापूर महामार्गावर सेवा रस्ता आणि खालून भुयारी मार्ग करण्याची गरज निर्माण झाली आहे.
वाखारी गावच्या मधून पुणे सोलापूर महामार्ग गेल्यामुळे वाखारी गाव आणि वाकडापुल असे दोन भाग झालेले आहेत. त्यातच याच ठिकाणावरून मुळा मुठा उजवा कालवा (कॅनॉल) गेलेला आहे. या सर्व परिस्थितीमुळे वाकडापूल येथील विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी अगोदर पुणे सोलापूर महामार्ग ओलांडावा लागतो नंतर पुन्हा कॅनॉलवरील छोट्या लोखंडी पुलावरून मुळा मुठा कालवा ओलांडावा लागत आहे.

या सर्व धोकादायक परिस्थिमुळे या शालेय विद्यार्थ्यांच्या जीवितास धोका निर्माण होत चालला आहे. हे विद्यार्थी ज्या ठिकाणी पुणे सोलापूर महामार्ग ओलांडतात तेथे कित्येक वाहनांचा अपघात होऊन अनेक लोकांचा जीव गेलेला आहे. त्यामुळे या ठीकाणावरून प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी पुणे सोलापूर महामार्गावर सेवा रस्ता करण्यात यावा तसेच ज्या ठिकाणी रस्ता ओलांडण्याची जागा आहे तेथे मोठा भुयारी मार्ग तयार करण्यात यावा अशी मागणी होत आहे.