महात्मा गांधी जयंती निमित्ताने दौंड मध्ये विद्यार्थ्यांनी राबविले स्वच्छता अभियान

दौंड : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्ताने येथील लर्न अँड प्ले शाळेच्या विद्यार्थ्यांनी स्वच्छता अभियान उपक्रम राबविला. शहरातील डिफेन्स कॉलनी (दीपमळा) परिसरात मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसामुळे झाडी, झुडपी वाढली होती. परिसरात साचलेल्या पाण्यामुळे सर्वत्र घाणीचे साम्राज्य झाले होते, सर्वत्र दुर्गंधी पसरल्याने स्थानिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला होता.

गांधी जयंती चे औचित्य साधित विद्यार्थ्यांनी संपूर्ण परिसर स्वच्छ केला. लर्न अँड प्ले शाळेच्या वतीने या परिसरामध्ये वृक्षारोपण करणार असल्याचा मानस शाळेच्या चेअरमन सविता भोर यांनी व्यक्त केला. शाळेच्या मुख्याध्यापिका अर्चना सोनवणे व शारीरिक शिक्षक वैभव कुकडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता अभियान राबविण्यात आले. स्थानिक वृक्ष संवर्धक दत्तात्रय शिंदे,रघुवीर शेळके, ज्येष्ठ विधीतज्ञ गोपाळ नगरकर, नंदा व मंजीराम मैराळ यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

महात्मा गांधी यांच्या स्वच्छतेच्या संदेशाला अनुसरून झालेला हा उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव निर्माण करणारा ठरेल असे मत ज्येष्ठ नागरिक संघटनेचे सचिव दत्तात्रय शिंदे यांनी व्यक्त केले. स्थानिक व पालकांनी विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाचे कौतुक केले.