मिरज, सांगली सह ग्रामीण भागात कडकडीत बंद

सुधीर गोखले

सांगली : ‘जालन्यातील लाठीहल्ला’ प्रकरणावरून सध्या राज्यभर वातावरण तापले असून आज सांगली जिल्ह्यात सकल मराठा समाज आणि विविध संस्था संघटनांच्या वतीने पुकारण्यात आलेल्या बंदला उत्फुर्त प्रतिसाद दिसून आला.

आज सकाळी मिरज शहराच्या प्रमुख मार्गावरून मराठा समाजासह श्री शिवप्रतिष्ठान आणि इतर संघटनांनी दुचाकी रॅली काढून सर्वत्र बंद चे आवाहन केले. आज मिरज हायस्कुल रस्ता, सराफ कट्टा, तांदूळ मार्केट आदी भागात कर्फ्यू सदृश्य स्थिती होती. सकाळी भाजप चे मिरज विधानसभा प्रमुख प्रा. मोहन वनखंडे यांच्यासह मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक विलास देसाई, अभिजित शिंदे विजय शिंदे, संदीप माळी, पप्पू शिंदे., संतोष माने, डॉ प्रताप भोसले, सचिन जाधव, दिगंबर जाधव, संदीप माने, प्रा विजय धुमाळ, नरेंद्र मोहिते आदींसह सर्व स्तरातील युवक या रॅली मध्ये सहभागी झाले होते.

आजच्या बंद मुळे सर्वत्र व्यवहार ठप्प होते भाजीपाला मंडई सह किराणा व्यापारी आणि सराफी दुकानंही आज बंद होती तर हॉटेल व्यावसायिक छोटे रेस्टोरंट, पानपट्टी असोसिएशन बार आणि परमिट रूम असोसिएशन यांनीही या बंद मध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.