शहरातील कायदा सुव्यवस्था बिघडविणाऱ्या समाज विघातक प्रवृत्ती विरोधात कडक कारवाई करणार – पोलीस अधीक्षक पंकज देशमुख

दौंड (अख्तर काझी) : शहरात कोणत्याही समाजाच्या उत्सवा दरम्यान काही समाज विघातक प्रवृत्तीच्या लोकांकडून शहरातील कायदा सुव्यवस्था बिघडेल असे कृत्य केली जात असतील तर पोलीस प्रशासनाच्या निदर्शनास आणून द्यावे, अशा समाजकंटकांवर कडक कारवाई केली जाईल असा इशारा पुणे जिल्हा ग्रामीण विभागाचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी देत  येणारी रमजान ईद शांततेत पार पाडावी असा संदेशही त्यांनी यावेळी दिला.

पंकज देशमुख यांनी दि. 12 मार्च रोजी दौंड पोलीस स्टेशनला भेट देऊन येथील पत्रकारांशी संवाद साधला व शहरातील विविध समस्या, सुविधांवर चर्चा केली. यावेळी बारामती विभागाचे अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, दौंड चे उपविभागीय पोलीस अधिकारी बापूराव दडस, दौंड चे पोलीस निरीक्षक गोपाळ पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील उपस्थित होते.

शहरातील वाहतूक समस्या, अवैध धंदे, कुरकुंभ एमआयडीसी मधील परप्रांतीय कामगारांचा प्रश्न, शहरात नव्याने झालेल्या कॉर्ड लाईन रेल्वे स्टेशनवरील रिक्षावाल्यांची मुजोरी तसेच या रिक्षावाल्यांकडून प्रवाशांच्या पैशांची होणारी लुटमार, परीक्षा केंद्रावरील पोलीस बंदोबस्त, दौंड -गोपाळवाडी रोडवरील सरपंच वस्ती बाजार तळावर महिलांना होणारा रोड रोमियोंचा त्रास, आदि विषय पत्रकारांनी पोलीस अधीक्षकांच्या निदर्शनास आणून दिले. या सर्व विषयांचा तपास करून संबंधितांवर कारवाई करण्याच्या सूचना त्यांनी पोलीस निरीक्षकांना केल्या.

कॉर्ड लाईन रेल्वे स्टेशन परिसरात व्यवसाय करणाऱ्या रिक्षावाल्यांची मुजोरी वाढली असून त्यांच्याकडून प्रवाशांची अक्षरशः लुटमार होत असल्याची माहिती पत्रकारांनी पोलीस अधीक्षकांना दिली, त्यावर ते म्हणाले की रिक्षा भाडे ठरविण्यासाठी जिल्हास्तरावर आरटीओ ची एक समिती आहे, रिक्षावाल्यांनी किती भाडे घ्यावयाचे हे समिती ठरविते. त्या समिती सोबत पोलीस प्रशासनाने एक संयुक्त बैठक घेऊन सदरचा विषय मार्गी लावावा अशी सूचना त्यांनी दौंड पोलीस स्टेशनच्या अधिकारी वर्गाला केली. जर हे रिक्षावाले प्रवाशांकडून अवास्तव भाडे (पैसे) घेत असतील तर प्रवाशांनी सुद्धा तक्रार केली पाहिजे. कारण शहरात रात्री – बेरात्री येणाऱ्या प्रवाशांची ही लुटमारच आहे. त्याचबरोबर या रिक्षावाल्यांची सुद्धा तपासणी करणे गरजेचे आहे, त्यांच्याकडे लायसन्स आहे का? त्यांची रिक्षा चोरीची तर नाही ना? हे सुद्धा तपासले पाहिजे.

पोलीस स्टेशनला दाखल गुन्ह्यांची माहिती पत्रकारांना दिली जात नाही अशी तक्रार पत्रकारांनी केली असता ते म्हणाले की, आपल्याकडे दाखल गुन्ह्यांची माहिती पत्रकारांना देण्यास काहीच हरकत नाही. तसेच पोलिसांनी जर काही कारवाई केली असेल त्याची सुद्धा माहिती पत्रकारांना द्यावी, हे आपल्याही फायद्याचेच आहे. पत्रकार आपलेच काम करीत असतात असेही ते म्हणाले.