भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा दौंडमध्ये रोड शो, शहरातील व्यापारी, टपरी धारक, नागरिकांशी साधला संवाद

अख्तर काझी

दौंड : भारतीय जनता पार्टी पक्षाने आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये मोठा विजय मिळविण्याचे ध्येय बाळगले आहे, आणि हे ध्येय साध्य करण्यासाठी महाविजय 2024 हे मिशन पक्षाने संपूर्ण देशभर राबविण्याचे सुरू केले आहे. आणि त्याचाच एक भाग म्हणजे पक्षाच्या वतीने शहरातून घर चलो संपर्क अभियान रॅलीचे आयोजन करण्यात आले.

या अभियानांतर्गत पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दौंड शहराला भेट दिली, यावेळी बावनकुळे यांनी शहरातील व्यापारी वर्ग, छोटे व्यावसायिक ,टपरीधारक तसेच येथील नागरिकांशी संवाद साधला. सामान्य माणसाच्या मनात नक्की काय चालले आहे, त्यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपा पक्षाबद्दल काय विचार व भावना आहेत याची माहिती घेऊन पक्षाला सध्याच्या कार्यपद्धतीमध्ये काही बदल करण्याची आवश्यकता आहे का याचा अंदाज या अभियानातून पक्ष घेणार आहे.

संपर्क अभियान रॅलीला येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून सुरुवात करण्यात आली. रॅलीमध्ये दौंड चे आमदार राहुल कुल , ,पुणे जिल्ह्याचे प्रभारी राजेश पांडे, पक्षाचे जिल्हाध्यक्ष वासुदेव काळे, कांचन कुल, पुण्याचे मा. महापौर मुरलीधर मोहोळ, बाळा भेगडे, रंजन तावरे, राहुल शेवाळे, तालुका अध्यक्ष हरिश्चंद्र ठोंबरे, शहराध्यक्ष स्वप्निल शहा तसेच पक्षाचे,व मित्र पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी होते. छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये रॅलीची सांगता करण्यात आली. यावेळी झालेल्या सभेमध्ये बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, डॉ. बाबासाहेबांच्या संविधानावर देश चालविणाऱ्या नरेंद्र मोदींना पुन्हा एकदा पंतप्रधान करण्याचे सर्वांनीच ठरविले आहे.

सत्तेवर आल्यानंतर हिंदू संस्कृती संपवू अशी भाषा करणाऱ्या विरोधी पक्षांना आगामी निवडणुकीत 440 होल्ट चा शॉक देऊन पराभूत करा व देश वाचवा असे आवाहन बावनकुळे यांनी केले. ते म्हणाले, एकाच देशात दोन संविधान ,दोन निशाण तुम्हाला पाहिजे का, कश्मीरच्या ज्या लाल चौकात कधी तिरंगा फडकला नव्हता त्या लाल चौकात तिरंगा फडकविणारे पंतप्रधान मोदी आहेत, आज मीतिला कोट्यावधी भारतीय कश्मीरला जाऊन तीरंग्याला सलाम करीत आहेत म्हणूनच पुन्हा मोदीच पंतप्रधान हवे आहेत असा प्रत्येक जण म्हणत आहे. या मोदीजींच्या नेतृत्वामध्ये अमेठी (A) जिंकली आता बारामती(B) जिंकावयाची आहे असा निर्धार करा. देशाचा इतिहास आहे की जेव्हा जेव्हा देश अडचणीत आला महिलांनी साथ दिली, म्हणूनच मोदींनी महिलांना 33% आरक्षण देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे.

दौंड शहरामध्ये घर चलो अभियान केले, जवळपास 1095 लोकांना मी भेटलो, यावेळी सर्व जाती धर्माचे लोक मला भेटले, मुस्लिम समाजाने माझे स्वागत केले. या शहरातला गरीब ,मध्यमवर्गीय माणूस म्हणतोय 2024 सालचे देशाचे पंतप्रधान हे नरेंद्र मोदीच असणार आहे. आणि त्यामुळे आता बारामतीचा खासदारही भाजपा, मित्र पक्षाचा असणार आहे. मोदी जेव्हा तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून शपथ घेतील तेव्हा बारामतीचा आपला खासदार हात वर करून त्या ठिकाणी उभा असेल आणि त्यासाठीच आम्ही घर चलो अभियान करण्यासाठी आलो आहे.

या अभियानामध्ये मला शेतकरी वर्ग, विद्यार्थी, महिला, युवती वर्ग सर्व भेटले सर्वांचे एक मत आहे की पंतप्रधान मोदीच पाहिजेत.
बावनकुळे पुढे म्हणाले, 65 वर्षापासून काँग्रेसने पाप केले, या देशाचे दोन तुकडे केले, या देशातला कश्मीर वेगळा केला. एक देश मे दो विधान ,दो निशान ,दो प्रधान, दो संविधान हे तुम्हाला मान्य आहे का. तुम्ही कमळाला मत दिले आणि 370 कलमाचे जे पाप काँग्रेस पार्टीने केले होते ते पाप मोदींनी रद्द केले.

म्हणूनच 2024 चे मतदान देशा करीता आहे, भारताला आणखीन भक्कम करायच्या असेल, आत्मनिर्भर भारत करायचे असेल, जगातला सर्वात सुंदर देश करायचा असेल तर मोदीजींच्या नेतृत्वातला भारत निर्माण करण्याकरता आपल्या सर्वांना आजपासून कामाला लागायचे आहे असे आवाहन बावनकुळे यांनी केले.