एसटी ड्रायव्हर, कंडक्टरला मारहाण, त्या ‘सात’ जणांवर अखेर गुन्हा दाखल

खडकी (दौंड) : दौंड तालुक्यातील खडकी गावातून जाणाऱ्या पुणे सोलापूर महामार्गावरील एसटी स्टॅण्डवर एसटी बस न थांबवल्याने ग्रामस्थ आणि चालक, वाहकांमध्ये काल दिनांक 03/06/2025 रोजी दुपारी 4.50 च्या सुमारास तुंबळ हाणामारी झाली. याबाबत आज दौंड पोलीस ठाण्यात सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपिंना अटक करण्यासाठी दौंड पोलिसांनी आरोपिंचा शोध सुरु केला आहे.

याबाबत बस ड्रायव्हर ज्ञानोबा मुजाजी वाघमारे (वय 34 वर्षे, बॅच नं. 26495, रा. बामनी पोस्ट गलसांघवी ता. कंधार जि. नांदेड) यांनी फिर्याद दिली असून त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, आरोपी प्रविन काळे (वय अंदाजे 45 ते 50 वर्षे) याने रोडच्या मध्यभागी उभे राहुन सोलापूर बाजूकडून पुणे बाजूकडे जात असलेल्या अहमदपूर-परळ या एसटी बस ला दागड मारला. यावेळी एसटी चालक, वाहक आणि इतर सहा आरोपिंमध्ये बाचाबाची झाली. ही घटना खडकी गावच्या हद्दीत सोलापुर पुणे हायवे रोडवर बस स्टॉपजवळ घडली.

यावेळी आरोपिंनी बेकायदा जमाव जमुन तुम्ही खडकी गावातील बस स्टॉपला गाडी का थांबवत नाही असे म्हणत या आरोपिंनी फिर्यादी व एस.टी. वाहक गोविंद चंद्रपालसिंह गहेरवाल यांना हाताने मारहाण करत शिवीगाळ व दमदाटी केली तसेच सरकारी कामात अडथळा आणून एस.टी बसचे नुकसान केले असल्याचे फिर्यादित म्हटले आहे. घटनेचा पुढील तपास दौंडचे सहाय्यक पोलीस फौजदार मलगुडे करीत आहेत.