पुणे-बिकानेर एक्स्प्रेसचे दोन भागांमध्ये विभाजन, प्रवाशांच्या खिशाला मात्र लागणार कात्री

सुधीर गोखले

सांगली : मध्य रेल्वे च्या पुणे विभागातर्फे ६ जून पासून पुणे-बिकानेर सुपर फास्ट एक्स्प्रेस सुरु होत आहे. हि रेल्वे सेवा भविष्यात मिरज-पुणे विशेष म्हणून कार्यरत राहील. एकाच गाडीचे दोन भागांमध्ये विभाजन करण्यात आल्याने मिरजेतून पुण्याला जाणाऱ्या प्रवाश्याना मात्र आर्थिक भुर्दंड बसणार आहे. रेल्वे प्रशासनाच्या या कारभारामुळे प्रवासी वर्गातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. 

पुणे-बिकानेर-पुणे साप्ताहिक चा मिरज जंक्शनपर्यंत विस्तार करण्यात आला आहे, परंतु मध्य रेल्वेने बिकानेर ते पुणे आणि पुणे ते मिरज परतीच्या प्रवासासाठी मिरज ते पुणे आणि पुणे ते बिकानेर अशा दोन टप्प्यात या एक्स्प्रेस ची विभागणी केली आहे. पण मिरज ते बिकानेर अशी एक्स्प्रेस सोडल्यास उत्पन्न वाढेल आणि पुणे रेल्वे स्टेशनचे महत्व कमी होईल यासाठी हि विभागणी असल्याचे रेल्वे प्रवासी संघटनांचे म्हणणे आहे. कोल्हापूर सांगली सातारा जिल्ह्यातून गुजरात व बिकानेरला जाणाऱ्या प्रवाश्यांची संख्या मोठी आहे. पण या प्रवाशांना विचारात न घेता रेल्वे प्रशासन मनमानी कारभार करत असल्याची भावना प्रवासी संघटनांची आहे. मध्य रेल्वेची मिरज-पुणे-मिरज अशी दर मंगळवारी साप्ताहिक एक्स्प्रेस सुरु होत आहे.

हि एक्स्प्रेस पुणे येथून सकाळी ८ वाजता सुटेल व मिरज मध्ये दुपारी १.४५ वाजता पोहोचेल. त्याच दिवशी मिरज मधून हि एक्स्प्रेस दुपारी २ वाजून २५ मिनिटांनी सुटेल व सायंकाळी ७. ४० वाजता पुणे स्थानकात पोचणार आहे. मिरज ते पुणे हे रेल्वे अंतर २८० किमी आहे. त्यासाठी ए सी ३ टायर ११०० रु. दर आहे तर १३६५ किमी अंतर असलेल्या पुणे ते बिकानेर प्रवासासाठी १६१० रु आकारले जातील विशेष दर्जा असलेल्या या एक्स्प्रेससाठी जादा पैसे द्यावे लागणार आहेत. हि एक्स्प्रेस मिरज पुणे मिरज न सोडता मिरज ते बिकानेर सोडावी अशी मागणी रेल्वे प्रवासी संघटना करत आहेत.

दोन आरक्षित तिकिटे घ्यावी लागणार – बिकानेर-पुणे-एक्स्प्रेस पुणे स्थानकावर आल्यानंतर अर्धा तासातच मिरज स्थानकासाठी रवाना होणार आहे. मात्र बिकानेर-मिरज असे तिकीट मिळणार नाही. एकाच गाडीला प्रवासाच्या दोन टप्प्यात वेगळे क्रमांक देण्यात आले आहेत. जर एखाद्या प्रवाशाला मिरज मधून बिकानेरला जायचे असले तर मिरज ते पुणे आणि पुणे ते बिकानेर अशी दोन आरक्षित तिकिटे घ्यावी लागतील व डबल भुर्दंड भरावा लागेल पर्यायाने प्रवाशांच्या खिशाला कात्री लागणार हे नक्की.