संपादकीय
सध्या सोशल मीडियावर धार्मिक तेढ निर्माण करण्याची जणू चढाओढच लागलेली दिसत आहे. कुणीपण उठावे आणि विशिष्ट समाजांवर, त्यांच्या धार्मिक गोष्टींवर स्वतःच्या कुबुद्धितून जन्माला आलेल्या शब्दांनी टिका करावी, एखाद्या जाती, धर्माला मानणाऱ्यांवर खालच्या दर्जाची टिप्पणी,पोस्ट करून वातावरण तणावपूर्ण बनवावे अशी सध्याची परिस्थिती बनत चालली आहे. एका विशिष्ट समाजाच्या मनात भीती भरवून, दबाव आणून, बहिष्कार टाकल्याजोगे कृत्य करून मनात आलेली एखादी कोणतीही गोष्ट साध्य करण्यासाठी वेळप्रसंगी प्रशासनालाही वेठीस धरले जाण्याच्या प्रकारांनाही सोशल मीडियाच्या माध्यमातून हवा दिली जात आहे.
सामाजिक आणि धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या अश्या लोकांना कायद्याचा धाक राहिला नसून एखाद्या जाती धर्माचे थेट नाव घेऊन माथी भडकवणारी स्टेटस ठेवली जाऊन खऱ्याचे खोटे आणि खोट्याचे खरे करून आपली मते कशी जपता येतील याचा प्रयत्न अश्या लोकांकडून सुरु असल्याचे दिसत आहे. एका विशिष्ट समाजावर कितीही टिका करा, कितीही वाईट पोस्ट, स्टेट्स ठेवा ते ऐकूण घेतात, रियाक्ट होत नाहीत या मानसिकतेतून आता उच्चशिक्षित तरुण आणि वेल सेटल असलेल्या व्यक्तीही यात हिरीरीने भाग घेताना दिसत आहेत.
वेगवेगळ्या गावांमध्ये एका विशिष्ट विचारधारेने प्रेरित होऊन एका समाजाला टार्गेट केले जात असल्याची प्रकरणे प्रकर्षाने जाणवू लागली आहेत. गावापातळीवर आमच्याच संस्था, आमचीच बॉडी मग तुमचे खरे काय आणि खोटे काय ते फक्त आमच्याच हातात असा अविर्भाव आणला जाऊन ताठ मानेने जगणाऱ्यांना सुद्धा आपल्यापुढे झुकविण्याची कला काही लोकांनी आत्मसात करून ठेवली आहे. त्यामुळे झुंडशाही आणि मॉब च्या बाजूने उभे राहण्याची मानसिकता वाढत चालली असून याचा प्रत्यय सध्या जवळपासच्या काही घटनांवरुन प्रकर्षाने जाणवू लागला आहे.
एखाद्याचे श्रद्धास्थान असलेल्या वास्तूंना लक्ष करून ते आमचे कसे आहे किंवा ते आमचे कसे होईल या इर्षेने कोणत्याही थराला जाऊन, झुंडशाही जमवून प्रशासनावर सुद्धा दबाव आणण्याचे प्रयत्न होऊ लागले आहेत. त्यामुळे या असल्या प्रकारांना पोलीस प्रशासनाने वेळीच आळा घातला नाही तर यातून सामाजिक सलोखा बिघडला जाऊन यातून मोठे वाद उत्पन्न होण्याची शक्यता नाकारता येत नाही.