पुणे : पुणे शहरातील येरवडा शास्त्रीनगर भागातील एका गल्लीमध्ये स्लॅब कोसळून यात 5 जण ठार झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. हे वृत्त हाती येईपर्यंत या स्लॅबच्या सांगाड्याखालून 3 मृतदेह बाहेर काढण्यात आले होते.
मिळालेल्या माहितीनुसार येरवडा, शास्त्रीनगर येथील गल्ली नंबर 8 मध्ये एका इमारतीचे स्लॅब ठोकण्याचे काम सुरू होते. यासाठी लागणारे लोखंडी छत बांधण्याचे काम सुरु असताना अचानकपणे हे छत कोसळले आणि यात जवळपास 5 कामगारांचा मृत्यू झाला असल्याचे समजत आहे.
साधारणपणे रात्री 11 च्या दरम्यान हे छत कोसळल्याचे प्रत्यक्षदर्शी सांगत आहेत.
येरवडा भागात लोखंडी छत कोसळल्याचे समजताच 10 रुग्णवाहिका, अग्निशामक दलाच्या 5 गाड्या आणि पोलिसांच्या गाड्या घटनास्थळी पोहचून मदतकार्य सुरू करण्यात आले आहे. मात्र हे लोखंडी छत अवाढव्य आणि अवजड असल्याने त्याखाली दबलेल्या कामगारांना बाहेर काढण्यासाठी कटरचा वापर करून ते छत तोडण्यात आले आणि त्यानंतर या छताखाली अडकलेल्या कामगारांना बाहेर काढण्याची प्रक्रिया सुरू झाली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आत्तापर्यंत म्हणजे साधारण रात्री 12 वाजेपर्यंत साधारण 10 कामगारांना बाहेर काढण्यात यश आले असून सर्वांना ससून रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. मात्र यात काहींची प्रकृती चिंताजनक सांगीतली जात आहे.