‘भीमा पाटस’ चा भोंगा वाजला… तालुक्यातील उस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंदी वातावरण

अब्बास शेख

दौंड : दौंड तालुक्यातील एकमेव सहकारी साखर कारखाना असणाऱ्या भीमा पाटस कारखाना लवकरच सुरु होणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. कारखान्यावर यंत्र सामग्रीची जोडणी सुरु असून काल रात्री भोंग्याची फायनल ट्रायल घेण्यात आली आहे. हा भोंगा वाजताच अनेकांनी आपल्या मोबाईलमध्ये या भोंग्याचा आवाज रेकॉर्ड करून सोशल मिडियावर व्हायरल करताच तालुक्यात आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

भीमा सहकारी साखर कारखाना हा भाडे तत्वावर चालवायला देऊन सभासद शेतकऱ्यांच्या उसाला चांगला भाव मिळण्यासाठी दौंडचे आमदार व भीमा पाटस सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन राहुल कूल हे शर्थीचे प्रयत्न करताना दिसत असून त्यांना यात मोठे यश प्राप्त होताना दिसत आहे.

दौंड तालुक्यात मधुकरराव शितोळे यांच्यानंतर अण्णा आणि आप्पा यांच्या हातात हा कारखाना सभासदांनी दिला होता. यावेळी कारखान्याचा विस्तार करण्यात आल्याने त्यावर कर्जाचा बोजाही वाढला होता. हे सर्व होत असतानाच अचानक अण्णांचे आकस्मिक निधन झाले आणि त्यांचे चिरंजीव राहुल कूल यांच्या हातात सभासदांनी हा कारखाना दिला. कारखान्यावर असणारा कर्जाचा बोजा फेडता फेडता कारखान्यात नवनवीन योजनानही राबविण्यात आल्या ज्यामध्ये डिस्टलरी, को-जनरेशन असे फायद्याचे प्रोजेक्ट सुरु करण्यात आले मात्र तरीही कारखान्यावर असणारे कर्ज आणि व्याज हे काही कारखान्याला उभारी घेऊ देत नव्हते. त्यामुळे कारखान्यात काम करणाऱ्या कामगारांचे पगार थकत होते आणि इतर गोष्टीही मान वर काढत होत्या या सर्वांवर मात करण्यासाठी आमदार राहुल कूल यांनी बंद पडणाऱ्या कारखान्याला आणि उस उत्पादक सभासद शेतकऱ्यांना नफा मिळवून देण्यासाठी मोठे धैर्य करत हा कारखाना भाडे तत्वावर चालविण्यास देण्याचा निर्णय घेतला आणि त्यास मोठ्या संख्येने सभासदांनीही साथ दिली आहे. आता लवकरच हा कारखाना सुरु होत असून कामगार आणि शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे.

आमदार राहुल कूल यांच्या अथक प्रयत्नांनंतर राज्य सहकारी बँकेने भीमा पाटस कारखाना भाडे तत्वावर चालविण्यास देण्याची निविदा काढली होती यामध्ये जे कोणी हा कारखाना 25 वर्षे भाडे तत्वावर चालविण्यास घेईल त्यांना पुणे जिल्हा बँकेचे 162 कोटी रुपये, तर राज्य सहकारी बँकेचे 33 कोटी रुपये भरावे लागणार होते. ज्यामध्ये 23 आणि 24 नोव्हेंबरला कारखाना पाहता येणार होता तर निविदा दाखल करण्याची अंतिम तारीख ही 3 डिसेंबर होती. डॉ.अजित देशमुख (व्यवस्थापकीय संचालक राज्य सहकारी बँक) यांनी ही निविदा प्रसिद्ध केली होती. विशेष म्हणजे या निर्णयाला विरोध असल्याचा आभास निर्माण करण्याचा जो काही प्रयत्न करण्यात येत होता त्यास कामगारांकडून काटशह देण्यात आला होता. आणि कारखाना भाडे तत्वावर चालवीण्यास देण्याच्या निर्णयाचे स्वागत करण्यात आले होते. तसेच भीमा पाटस कारखाना कामगार संघाचे अध्यक्ष अर्जुन दिवेकर यांनीही या निर्णयाचे स्वागत केले होते. आणि यात जुने कामगारही कामावर घेतले जाणार असून त्यांची देणी टप्प्याटप्प्यांनी मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले यावेळी सांगितले होते. आता कारखाना पुन्हा एकदा जोमाने सुरु होणार असून यात सभासद शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे.