अनाथांची ‛माय सिंधू ताई सपकाळ’ सर्वांना अनाथ करून निघून गेली…

पुणे : अनाथांना आसरा देणारी, आईची माया देणारी, अनाथांची माय’ म्हणून ओळखली जाणारी अनाथांची माय 73 वर्षीय ‛सिंधुताई सपकाळ’ यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं आज मंगळवारी निधन झालं आहे. त्यांना प्रकृतीच्या अस्वस्थतेमुळे 24 डिसेंबरलाच पुण्यातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते तेथे त्यांच्यावर उपचार सुरू होते. आज मंगळवारी रात्री त्यांनी 8 वाजण्याच्या दरम्यान या जगाचा निरोप घेतला आणि पुण्यातील त्यांच्या अनाथालयांमध्ये एकच हल्लकल्लोळ माजला आहे. सिंधू ताईंचे अनमोल सामाजिक कार्य पाहून त्यांना जानेवारी 2021 मध्ये केंद्र सरकारतर्फे पद्मश्री किताब जाहीर झाला होता.
सिंधू ताई यांच्यावर गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये एक शस्त्रक्रियाही करण्यात आली होती. मात्र त्यांचे प्राण वाचू शकले नाहीत. सिंधू ताईंनी आयुष्यभर अनाथ, निराधार मुलांचे संगोपन केले आणि त्यांचा सांभाळ केला. आज ती हजारो मुले खऱ्या अर्थाने आपल्या आईला पोरकी होऊन अनाथ झाली असल्याच्या भावना जनसामान्यांमधून उमटत आहेत.