पुणे : भोर तालुक्यातील गुंजवणी नदी पात्रातील बंधाऱ्यामध्ये इलेक्ट्रिक मोटार सोडताना विजेचा शॉक लागून चौघांचा मृत्यू झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार भोर येथील गुंजवणी नदी पात्रात एक बंधारा असून त्या बंधाऱ्यामध्ये इलेक्ट्रिक मोटार सोडत असताना विठ्ठल सुदाम मालुसरे (वय 45), सनी विठ्ठल मालुसरे (वय 26), आनंदा ज्ञानेश्वर जाधव (वय 55)आणि अमोल चंद्रकांत मालुसरे (वय 36) या चौघांना विजेचा जबरदस्त धक्का बसला आणि यात या चौघांचाही दुर्दैवी असा मृत्यू झाला.
या भयानक घटनेची माहिती वाऱ्यासारखी पसरली आणि या ठिकाणी गावकरी मोठ्या प्रमाणावर जमा झाले होते. तर प्रशासकीय अधिकाऱ्यांनीही त्वरित घटनास्थळी धाव घेत घटनेची माहिती घेण्याचे काम सुरु केले होते.
या घटनेत बाप लेकासह चौघांचा मृत्यू झाला असून हे चौघेही निगडे गावचे असल्याने संपूर्ण निगडे गाव शोकसागरात बुडालेला पहायला मिळत आहे.
खा.सुप्रिया सुळे यांकडून शोक व्यक्त
भोर तालुक्यातील निगडे धांगवडी येथे पाण्यातील मोटार बाहेर काढताना वीजप्रवाह पाण्यात उतरल्याने मालुसरे कुटुंबातील तीन व जाधव कुटुंबातील एका व्यक्तीचा मृत्यु झाला. ही घटना अतिशय दुःखद आहे. मालुसरे व जाधव कुटुंबावर कोसळलेल्या या कठीण प्रसंगात आम्ही सर्वजण त्यांच्या सोबत आहोत भावपूर्ण श्रद्धांजली अश्या शब्दांत खा.सुप्रिया सुळे यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.