मुंबई : काल विधानपरिषदेच्या निवडणुकीत बसलेला धक्का शमत नाही तोच आज पुन्हा सत्ताधारी महाविकास आघाडीला धक्का देणारी बातमी समोर येत आहे. कालच्या विधान परिषद निवडणुकीनंतर आता शिवसेनेतील अंतर्गत नाराजी नाट्य समोर येत समजत आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अत्यंत जवळचे विश्वासू शिवसेना नेते एकनाथ शिंदे हे कालपासून 13 आमदारांसह नॉट रिचेबल असल्याचे वृत्त समोर येत आहे. विशेष म्हणजे ते सुरत येथील एका भव्य हॉटेलमध्ये असल्याचेही समजत आहे. या सर्व प्रकारामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची चिंता आणखी वाढली आहे. या संदर्भात वर्षा बंगल्यावर बैठका होत असून आज पुन्हा याबाबत बैठक बोलविण्यात आली आहे.
सोमवारी पार पडलेल्या विधान परिषद निवडणुकीत शिवसेनेने आपले दोन्ही उमेदवार विजयी करण्यात यश मिळवले. मात्र, या निवडणुकीत काँग्रेससोबत शिवसेनेचेही मते फुटली असल्याची चर्चा सुरू आहे. आता फुटलेल्या मतांवरून आता शिवसेनेतच फूट पडतेय का अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
काल निवडणूक निकालानंतर एकनाथ शिंदे आणि त्यांचे 13 समर्थक आमदार नॉट रिचेबल असल्याचे समोर आले त्यानंतर आज ते आमदारांसह गुजरातच्या सुरत येथील एका भव्य हॉटेलमध्ये असल्याची माहिती समजली आहे. आज शिवसेनेची बैठक दुपारी बोलावण्यात आली असून त्यावेळी एकनाथ शिंदे हजर राहणार का याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. कॉंग्रेसला मतदान करण्यावरून शिवसेनेच्या आमदारांमध्ये नाराजी आहे असं म्हटलं जात आहे.