दौंड : केंद्रातील भारतीय जनता पार्टी चे सरकार केंद्रीय यंत्रणांचा दबाव आणून विरोधकांवर सूडबुद्धीने कारवाया करीत असल्याच्या निषेधार्थ दौंड शहर व तालुका शिवसेना पक्षाच्यावतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी पक्षाच्यावतीने पोलीस प्रशासनाला निषेधाचे निवेदन देण्यात आले.
शिवसेनेने आपल्या निवेदनात, भारतीय जनता पार्टीच्या केंद्र सरकारने लोकशाहीचा गळा घोटण्याचा एक कलमी कार्यक्रम हाती घेतल्याचे वारंवार दिसत आहे. केंद्रीय यंत्रणा निष्पक्ष पणे काम करण्याऐवजी भाजपा धार्जिणे धोरण अवलंबून विरोधी पक्षातील नेत्यांच्या व परिवाराच्या प्रतिमेला लक्ष बनवीत आहेत. सत्य आणि प्रामाणिक राजकारणाची सध्या गळचेपी होत असून, खोट्या आरोपांमधून, कारवायांमधून विरोधकांची बदनामी व प्रतिमाहणन केले जात आहे. अशा हुकूमशाही धोरणाचा देशातील जनता निषेध करीत असल्याचे म्हटले आहे.
तसेच देशापुढे बेरोजगारी, महागाई, गरिबी असे प्रश्न भेडसावत असताना जनतेचे लक्ष इतरत्र वळविण्यासाठी केंद्र सरकार ठरवून विरोधी नेत्यांना बदनाम करण्यासाठी सर्व यंत्रणांचा सूडबुद्धीने गैरवापर करीत आहे. जे विरोधक त्यांच्या दबावाला बळी पडत नाहीत अशांना त्रास देण्याची अमानवीय कृत्य केंद्र सरकार करीत आहे, त्याचा शिवसेना निषेध करीत आहे. केंद्र सरकारच्या भाजपा धोरणातून नियुक्त असलेले सन्माननीय राज्यपाल महाराष्ट्राच्या अस्मितेच्या, समाज सुधारकांच्या विरोधात बेताल व्यक्तव्य करीत आहेत अशा भाजपा धार्जिणे राज्यपाल यांचाही महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिक निषेध व्यक्त करीत आहे. असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
केंद्र सरकारने आपल्या यंत्रणांचा गैरवापर करीत शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर ईडीच्या माध्यमातून सूडबुद्धीने कारवाई केलेली आहे, केंद्रीय यंत्रणांचा दबाव आणून विरोधकांना संपविण्याचे काम भाजपा सरकार करीत आहे म्हणूनच या सरकार विरोधात आम्ही निषेध व्यक्त करून आंदोलन केले आहे असे यावेळी जिल्हा उपप्रमुख अनिल सोनवणे म्हणाले. पक्षाचे पदाधिकारी शरदचंद्र सूर्यवंशी, संतोष जगताप, अजित आटोळे, राजेंद्र खटी, कैलाश शहा, गणेश दळवी, योगेश फडके नामदेव राहिंज, अमोल जगताप, रुपेश बंड तसेच पक्षाचे पदाधिकारी व शिवसैनिक बहुसंख्येने उपस्थित होते.