मुंबई : ‘कांटा लगा’ या रीमिक्स गाण्यावर डान्स करून संपूर्ण देशात धुमाकुळ घालणाऱ्या शेफाली जरीवालाचे रात्री हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले आहे.
शेफाली जरीवालाच्या अचानक झालेल्या मृत्यूने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. शेफाली जरीवालाचा पती पराग त्यागी तिच्या मृत्यूने खूपच खचला आहे. काहीवेळापूर्वी आपल्यासोबत गप्पागोष्टी करत असलेल्या आपल्या पत्नीच्या मृत्यूची बातमी ऐकल्यानंतर त्याची अवस्था खूपच बिकट झाल्याचे पहायला मिळाले.
‘कांटा लगा गर्ल’ शेफाली जरीवालाचे २७ जून २०२५ च्या रात्री अचानक निधन झाले. या अभिनेत्रीच्या अचानक निधनाने सर्वांनाच धक्का बसला आहे. रात्री उशिरा शेफालीची तब्येत बिघडल्यानंतर, तिचा पती पराग त्यागी तिला बेलेव्ह्यू मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला, जिथे अभिनेत्रीला मृत घोषित करण्यात आले. शेफालीच्या मृत्यूनंतर, परागचा हॉस्पिटलमधून बाहेर पडण्याचा पहिला व्हिडिओ समोर आला आहे.
शेफाली जरीवाला या अभिनेत्रीचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाला असल्याचे सांगितले जात आहे. शेफालीच्या वयाच्या अवघ्या ४२ व्या वर्षी झालेल्या आकस्मिक निधनाची बातमी ऐकून सेलिब्रिटींनाही धक्का बसला आहे. अली गोनी, मिका सिंग, राजीव अदातिया, काम्या पंजाबी यांसारख्या स्टार्सनी सोशल मीडियावर पोस्ट करून अभिनेत्रीला श्रद्धांजली वाहिली आहे.