शरद पवारांचा अजित पवारांना मोठा धक्का, या ठिकाणच्या अजित पवार गटातील 333 पदाधिकाऱ्यांचा शरद पवार गटात प्रवेश

पुणे : जेष्ठ नेते शरद पवार हे आपले पुतणे अजित पवारांना धक्क्यावर धक्के देताना दिसत आहेत. बारामतीमध्ये अजित पवारांचे महत्वाचे शिलेदार आपल्या गटात सामिल केल्यानंतर आता शरद पवारांनी पुन्हा एकदा अजित पवारांना मावळमध्ये मोठा झटका दिला आहे. शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये मावळ मधील तब्बल 333 पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटात प्रवेश केला आहे.

शरद पवारांच्या पुणे जिल्ह्यातील दौऱ्यांमुळे सध्या अजित पवार गटात चिंतेचे वातावरण पहायला मिळत आहे. अजित पवारांना नामोहरम करण्याची एकही संधी शरद पवार सोडताना दिसत नाहीत. अजित पवारांनी शरद पवारांपासून फारकत घेतल्यानंतर शरद पवार हे पुन्हा एकदा कामालीच्या वेगाने पक्ष बांधणीकडे वळलेले दिसत आहेत.

अजित पवारांनी शिरूर मध्ये लक्ष घालताच शरद पवारांनी मावळ, शिरूर या भागाकडे आपला मोर्चा वळवला आहे. अजित पवारांचे एक एक विश्वासू पदाधिकारी शरद पवारांच्या गळाला लागताना दिसत आहेत. शरद पवारांच्या या चालीने अजित पवार गट मात्र मोठ्या चिंतेत दिसत आहे.