कुरकुंभ एमआयडीसी मध्ये स्फ़ोटांची मालिका सुरूच… भीषण स्फ़ोटात एक गंभीर

दौंड : गेल्या काही वर्षांमध्ये दौंड तालुक्यातील कुरकुंभ औद्योगिक वसाहत तेथील स्फ़ोटांमुळे कायमच चर्चेत राहत आली आहे. शनिवारी पहाटेच्या सुमारास पुन्हा एकदा अशाच स्फ़ोटाचा अनुभव येथील नागरिकांनी घेतला आहे. कुरकुंभ एमआयडीसी मधील अल्काईल अमाईन्स केमिकल्स लिमिटेड या कंपनीत केमिकल साठवणूक टॅंक चा भीषण स्फोट होऊन यात एकजण गंभीर जखमी झाला आहे.

शनिवारी पहाटेच्या सुमारस ही भयंकर घटना घडली असून टॅंक मध्ये डिस्टिलेशन रेसिडेंट प्रेशर जास्त झाल्यामुळे येथील ही टाकी फुटल्याची माहिती देण्यात आली आहे. या घटनेत आत्तापर्यंत कुणाची जीवित हानी झाल्याची माहिती मिळाली नसली तरी या दुर्घटनेत नेमके किती कामगार भाजले आहेत हे मात्र अजूनही समजू शकले नाही. जखमी कामगाराला उपचारासाठी पुण्याला हलवण्यात आले आहे.

या घटनेची माहिती मिळताच औद्योगिक सुरक्षा व आरोग्य विभागाचे उपसंचालक अखिल घोगरे, सुरक्षा अधिकारी अकुंश खराडे, दौंडचे पोलीस निरीक्षक गोपाळ पवार, सहायक पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली. या घटनेबाबत दौंड पोलीस ठाण्यात अजून गुन्हा दाखल झाला नसल्याची माहिती पोलीस निरीक्षक पवार यांनी दिली आहे.