निर्दयीपणाचा कळस… सासवड येथे भंगार गोळा करणाऱ्या दोघांना बेदम मारहाण करत अंगावर गरम पाणी ओतून खून! अंडाभुर्जी गाडा चालकावर दुहेरी खूनाचा गुन्हा दाखल

पुणे

सासवड येथे एका अंडाभुर्जी गाडा चालकाने आपल्या गाड्या जवळून भंगार गोळा करणाऱ्या दोघांना हाकलून लावण्यासाठी त्यांना बेदम मारहाण करत अंगावर गरम पाणी ओतून त्यांचा खून केल्याची आणि एका वृद्ध महिलेला काठीने मारहाण करण्याची धक्कादायक घटना दि.23 मे ते दि.
24 मे दरम्यान घडली होती.

या प्रकरणी सासवड पोलिसांनी तपास करत आरोपी निलेष उर्फ पप्पु जयवंत जगताप याच्यावर दि.30 मे रोजी दुहेरी खून केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची फिर्याद सासवड पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस उपनिरीक्षक सुनील रामचंद्र चिखले यांनी दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार निलेश जगताप याने भंगार गोळा करणारे एक अनोळखी पुरूष (वय अंदाजे ५० वर्षे) व दुसरा अनोळखी पुरूष (वय अंदाजे ६० वर्षे) यास हातगाडीच्या जवळून उठून लावण्यासाठी बेदम मारहाण केली आणि त्यांच्या हातावर गरम पाणी टाकले. त्याने केलेल्या या मारहाणीमुळे सदरचे दोन्ही अनोळखी इसम मरण पावले. तर शेवंताबाई सखाराम जाधव (वय ६५ वर्षे) यांच्या हातावर आरोपीने लाकडी काठीने मारहाण करून त्यांना गंभीर दुखापत केली.

हा सर्व प्रकार दि.23 मे ते दि.24 मे च्या दरम्यान घडला होता याबाबत सासवड पोलिसांनी तपास करत आरोपी निलेश उर्फ पप्पु जयवंत जगताप याचे विरूध्द गुन्हा दाखल केला. अधिक तपास पोलीस निरीक्षक घोलप करत आहेत.