सुधीर गोखले
सांगली : राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता असलेल्या नालसाब मुल्ला याच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी बेछूट गोळीबार करत त्याची हत्या केली. ही घटना सांगलीतील नेहमी गजबजलेल्या शंभर फुटी रस्त्यावरील त्याच्या घरासमोरच घडली आहे. या घटनेमुळे सांगली पुन्हा एकदा हादरली आहे.
राष्ट्रवादीचा कार्यकर्ता नालसाब मुल्ला याच्यावर दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी बेछूट गोळीबार केला. या हल्लेखोरांनी नालसाबवर तब्बल सात ते आठ राउंड फायर केले. या हल्ल्यात त्याच्या डोक्यात दोन गोळ्या लागल्याने तो जागीच कोसळला. हल्ला करून हल्लेखोर पसार झाल्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या नालसाब चा तेथे मृत्यू झाला. हा हल्ला पूर्व वैमनस्यातून झाला असावा असा प्राथमिक संशय पोलीस प्रशासनास आहे.
या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली पोलीस उपाधीक्षक आण्णासाहेब जाधव आपल्या कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले होते. नालसाब मुल्लावर कोणी आणि कोणत्या कारणाने हल्ला केला याचा तपास पोलीस अधिकारी करत आहेत. कालच पालकमंत्र्यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयात पोलीस अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली होती तर दिवसांपूर्वी सांगली जिल्ह्यातील वाढत्या गुन्हेगारी बद्दल राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पोलीस अधीक्षक डॉ बसवराज तेली यांच्या कडे निवेदनाद्वारे चिंता व्यक्त केली होती.