वानखेडेंनी गैर प्रकार करून नोकरी मिळवली.. त्यांचे नाव समीर दाऊद वानखेडे – नवाब मलिक
माझा शबानाशी विवाह झाला होता, मात्र – समीर वानखेडे

मुंबई : क्रूझ शिपवर ड्रग्ज पार्टी झाल्यानंतर एनसीबी आणि राज्यमंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आणि आरोप प्रत्यारोप दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. एनसीबी चे अधिकारी यांनी छापा टाकून आर्यन खान व त्याच्या काही साथीदारांना पकडल्यानंतर जे पंच आणि साक्षीदार यात घेतले होते यातील एक साक्षिदार किरण गोसावी हा अनेक गुन्ह्यांतील आरोपी असल्याचे समोर आले होते, नंतर काल रात्री यातील प्रमुख पंच प्रभाकर साईल याने मीडियावर येत एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर लाच मागितल्याचा आरोप करून माझ्या कोऱ्या कागदावर सह्या घेण्यात आल्याचे जाहीर केले आणि किरण गोसावी, समीर वानखेडे यांच्यात आर्यन खान याला सोडण्यासाठी कशी डील होत होती यावर माहीत देत एकच खळबळ उडवून दिली.
हे सर्व होत असतानाच आज मंत्री नवाब मलिक यांनी दोन ट्विट करत पुन्हा खळबळ उडवून दिली आहे आणि समीर वानखेडे यांनी गैरप्रकार करून नोकरी मिळविल्याचा गंभीर आरोप केला आहे. हा आरोप करताना त्यांनी समीर दाऊद वानखेडे असे वानखेडे यांचे संपूर्ण नाव असून त्यांनी त्यांचा एक फोटोही शेअर केला आहे.

यानंतर समीर वानखेडे यांचे पहिले लग्न डॉ. शबाना कुरेशी यांच्याशी झाल्याचे फोटोही झपाट्याने सोशल मिडियावर व्हायरल झाल्याचे दिसून येत आहेत. या सर्वांवर माहिती देताना समीर वानखेडे यांनी आपल्या वडिलांचे नाव दाऊद नसून ज्ञानदेव असल्याचे सांगितले आहे. तर डॉ.शबाना कुरेशी यांच्याशी 2006 मध्ये लग्न झाल्याचे मात्र मान्य करत 2016 मध्ये आपण शबाना कुरेशी यांच्यापासून कायद्यानुसार घटस्फोट घेतल्याचे मान्य केले आहे. तसेच नवाब मलिक यांनी अपल्या जन्म दाखल्याबद्दल जे फोटो शेअर केले आहेत ते खोटी असल्याचे आणि आपल्या मूळगावी गेल्यास तेथे सर्वकाही समजेल असे सांगितले आहे. या सर्व प्रकाराबद्दल आपण कायदेशीर आव्हान देणार आल्याचेही वानखेडे यांनी सांगितले आहे.