|सहकारनामा|
दौंड : खासदार संभाजी राजे छत्रपती यांचे मराठा समाजाच्या वतीने दौंड मध्ये जल्लोषात स्वागत करण्यात आले. पुण्याहून कोपर्डी (नगर) ला जात असलेल्या राजेंचे येथील मराठा समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. संभाजी राजेंच्या गाड्यांचा ताफा शहरातील मदर तेरेसा (नगर मोरी) चौकामध्ये येताच उपस्थित युवकांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो अशा घोषणांनी आसमंत दणाणून सोडला. यावेळी मराठा महासंघाचे शहराध्यक्ष शैलेश पवार, नाना जगताप, दादा नांदखिले,उमेश वीर, बाबा पवार, निखिल स्वामी, अमित जठार, गणेश घोलप, सुशांत परकाळे तसेच समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते, महिलांची उपस्थितीही लक्षणीय होती. खासदार संभाजी राजे छत्रपती यांनीही समाज बांधवांच्या भावनांची कदर करीत गाडीतून उतरून शुभेच्छा स्वीकारल्या व हात जोडून सर्वांचे आभार मानले.
मराठा आरक्षणाचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावल्याने खासदार संभाजी राजे छत्रपती यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाने एल्गार पुकारला आहे.
या पार्श्वभूमीवर संभाजी राजे यांनी संपूर्ण महाराष्ट्रात दौरे करण्यास सुरुवात केली आहे. कोणत्याही परिस्थितीत मराठा समाजाला आरक्षण मिळवून देणारच असा दृढ निश्चयच संभाजी राजे यांनी केला आहे.