‘संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड’ आक्रमक होताच स्पर्धेच्या विषयांमध्ये बदल!

दौंड : पुणे जिल्हा परिषदेने विद्यार्थ्यांसाठी घेण्यात येत असलेल्या वक्तृत्व, निबंध आणि गायन स्पर्धेमध्ये जे विषय दिले होते त्यामध्ये भजन गायनासाठी थेट जातीय उल्लेख असणारा अभंग दिला गेला असल्याचा आक्षेप जिजाऊ ब्रिगेडने घेतला होता. तर वक्तृत्व स्पर्धेसाठी जे विषय दिलेले होते त्यामध्ये महिला समाज समाजसुधारकामध्ये जिजाऊ, क्रांतिज्योती सावत्रीबाई फुले यांचे विषय का टाळले असा प्रश्न उपस्थित करून पुणे जिल्हा संभाजी ब्रिगेड व जिजाऊ ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी व जिजाऊ रणरागिनींनी पुणे जिल्हा परिषदेत जाऊन प्राथमिक शिक्षणाधिकारी यांची भेट घेत निषेधाचे निवेदन दिले होते. त्यास आता यश आल्याचे पहायला मिळत आहे.

या निवेदनात प्राथमिक मधील चिमुकल्या मुलांना भजन गायनासाठी जातीय उल्लेख असणारा अभंग जिल्हा परिषदेकडून परिपत्रकात देण्यात आला असल्याचा आरोप यावेळी संभाजी ब्रिगेड आणि जिजाऊ ब्रिगेडकडून करण्यात आला होता.

तसेच महामाता सावित्रीमाता फुले यांनी मुलींच्या शिक्षणासाठी मोठे अन्यान सहन करून पुणे शहरामध्ये देशातील मुलींची पहिली शाळा सुरू केली. त्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या पुणे जिल्हा परिषदेच्याच विद्यार्थ्यांसाठी असणाऱ्या स्पर्धेमध्ये वक्तृत्वाचा व निबंधाचा विषय का होऊ शकत नाही? तसेच राष्ट्रमाता स्वराज्य संकल्पक जिजाऊंनी याच पुण्यामध्ये शिवरायांना स्वराज्य घडवण्याचे धडे दिले, जिजाऊंचा तो आदर्श आजच्या पुणे जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्वाचा निबंधाचा विषय का होऊ शकत नाही? असा सवाल जिजाऊ ब्रिगेडने उपस्थित करत जिजाऊ, सावित्रीबाई, मुक्ता साळवे, आहील्याबाई होळकर, माता रमाई, फातिमा शेख या जाणीवपूर्वक विद्यार्थ्यांना कळू द्यायच्या नाहीत का? विद्यार्थ्यांना त्यांचा अभ्यास करून द्यायचा नाही का ? हे एक षड्यंत्र आहे का? असा सवाल संभाजी ब्रिगेड व जिजाऊ ब्रिगेडने उपस्थित केल्याने वातावरण तंग झाले होते.

हा प्रकार निदर्शनास आणून दिल्यानंतर पुणे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी सौ.संध्या गायकवाड यांनी सदर परिपत्रक मागे घेत स्पर्धांचे विषय बदलण्याची घोषणा केली व त्यानंतर नवीन परिपत्रक जारी केले व त्यामध्ये सर्व महामाता यांचा समावेश केला असल्याचे व वादग्रस्त विषय वगळून त्यांनी स्पर्धा घेतल्या जातील असे सांगत व दिलगिरी पत्र लिहून दिले असल्याचे यावेळी संभाजी ब्रिगेड व जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने सांगण्यात आले आहे.

यावेळी पुणे जिल्हा परिषद येथे मुख्यशिक्षणाधिकारी यांच्या दालनात संभाजी ब्रिगेड जिजाऊ ब्रिगेडचा दौंड तालुका अध्यक्ष शिवमती सारिका भुजबळ, पुणे महानगर अध्यक्ष स्मिता म्हसकर, गीता गाढवे, शोभा जगताप, प्रियंका पाटील तसेच धडाडीचे संभाजी ब्रिगेडचे राज्य संघटक संतोष शिंदे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर गाडगे जिल्हाध्यक्ष उत्तम कामठे जिल्हा संघटक भरत भुजबळ शाम पाटील व अन्य पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.