केडगाव सहकारी सोसायटीच्या निवडणुकीमध्ये ‘सहकार परिवर्तन पॅनल’ चा दणदणीत ‘विजय’

दौंड : केडगाव येथील कुल-थोरात गटाने अतिशय प्रतिष्ठेची केलेल्या केडगावच्या सहकारी सोसायटी निवडणुकीत सहकार परिवर्तन पॅनलचा 11/2 अश्या मोठ्या फरकाने दणदणीत विजय झाला आहे. सहकार परिवर्तन पॅनलचे 11 तर जनसेवा पॅनलचे 2 उमेदवार निवडून आले आहेत.
या निवडणुकीच्या प्रचारासभेपासूनच दोन्ही गटांकडून मोठ्या प्रमाणावर ‘शक्ती प्रदर्शन’ करण्यात आले होते.
दौंड तालुक्यामध्ये विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायट्यांच्या निवडणूकांना सुरुवात झाली असून पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून या सहकारी सोसायट्यांना आणि त्यांचे सभासद असणाऱ्या शेतकरी सदस्यांना कर्जरूपी आर्थिक मदत मिळत असते त्यामुळे या सहकारी सोसायटिंवर अगोदर पासूनच जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष आणि विद्यमान जेष्ठ संचालक रमेश थोरात यांचे वर्चस्व पाहायला मिळते. रमेश थोरात हे जवळपास 35 वर्षांपासून या बँकेवर संचालक म्हणून निवडून जात आहेत. तालुक्यात अनेक ठिकाणी या सोसायट्यांची निवडणूक हा मोठा प्रतिष्ठेचा विषय बनला आहे.
केडगाव विका सोसायटी अशीच एक मोठी सोसायटी असून या सोसायटीसाठी जनसेवा पॅनल आणि सहकार परिवर्तन पॅनल असे आमदार राहुल कुल आणि माजी आमदार रमेश थोरात यांना मानणारे दोन प्रबळ गट आमने सामने ठाकले होते. जनसेवा पॅनल ने आमदार राहुल कुल यांचा फोटो आपल्या प्रचार पत्रिकेत छापत ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. तर माजी आमदार रमेश थोरात यांना मानणाऱ्या सहकार परिवर्तन पॅनलने मात्र अगोदर माजी आमदार रमेश थोरात यांचा फोटो आपल्या प्रचार पत्रिकेत छापलेला नव्हता परंतु निवडणूक जसजशी चूरशीची होत गेली तसतसे आप्पा विरुद्ध दादा असे कार्यकर्ते विभागले जाऊन सहकार परिवर्तन पॅनलनेही माजी आमदार रमेश थोरात यांचा फोटो लावण्यास सुरुवात केली.
ही निवडणूक अतिशय चूरशीची होत जाऊन रविवार दि.6 मार्च रोजी सकाळी 8 वाजता मतदानाला सुरुवात झाली आणि सायंकाळी 4 वाजता मतदान प्रक्रिया आटोपून त्वरित मतमोजणीला सुरुवात झाली. अगोदर पासूनच सहकार परिवर्तन पॅनलचे सहा तर जनसेवा पॅनलचे दोन उमेदवार आघाडीवर होते. मतमोजणी पूर्ण झाल्यानंतर निवडणूक अधिकाऱ्यांकडून सहकार परिवर्तन पॅनलचे 11 आणि जनसेवा पॅनलचे 2 उमेदवार विजयी घोषित करण्यात आले.
सहकार परिवर्तन पॅनलचे प्रचार प्रमुख म्हणून पाराजी हंडाळ, बाळासो कापरे, माणिक राऊत, धोंडिबा शेळके यांनी काम पाहिले तर जनसेवा पॅनलकडून आप्पासाहेब हंडाळ, किरण देशमुख, शहाजी गायकवाड, बंडू शेळके यांनी प्रचाराची धुरा हातात घेतली होती. निवडणूक निकाल लागताच विजयी उमेदवारांच्या गटातील कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी करत आपला आनंद साजरा केला.