दौंड : (अख्तर काझी)
दौंड रेल्वे प्रशासनाच्या हद्दीमध्ये येथील भंगार चोरी करणाऱ्या टोळ्यांनी अक्षरशः उच्छाद मांडला असल्याचे समोर येत आहे. आणि रेल्वे प्रशासनाच्या मालमत्तेचे संरक्षण करण्याची जबाबदारी असलेले रेल्वे सुरक्षा बल(RPF) पोलिस याकडे जाणीवपूर्वक कानाडोळा करीत असल्याचा आरोप सुद्धा होत आहे.
त्यामुळे रेल्वेच्या मालमत्तेचा सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर येत आहे. दौंड शहर व जवळपासच्या हद्दीत अनेक भंगार चोरी करणाऱ्या टोळ्या कार्यरत आहेत. रेल्वे प्रशासनाच्या मालमत्तेवर तर या टोळ्यांचा नेहमीच डोळा असतो, सध्या तर या टोळ्या बिनदिक्कत पणे रेल्वे परिसरात घुसून रेल्वेच्या भंगारात पडलेल्या मालावर डल्ला मारून आपला गोरख धंदा करीत आहेत. या भंगार चोर टोळ्यांची मजल इतकी गेली आहे की त्यांनी आता कुरकुंभ मोरी (भुयारी मार्ग) सारख्या रस्त्यावर असलेल्या ठिकाणीसुद्धा रेल्वेच्या मालाची चोरी करण्याचे धाडस सुरू केले आहे.
दौंड शहराला जोडणारे दोन भुयारी मार्ग हे रेल्वे प्रशासनाच्या हद्दीत येतात. भुयारी मार्गांच्या गटारी वर रेल्वे प्रशासनाने मजबूत, जड वजनाच्या लोखंडी जाळ्या बसविल्या होत्या त्या लोखंडी जाळ्या भंगार चोरांनी रात्रीच्या वेळेस चोरून नेल्या आहेत, या जाळ्या इतक्या जास्त वजनाच्या व मोठ्या होत्या की त्यांना सहजपणे काढून नेणे एकट्याचे काम नाही. या जाळ्या सहजासहजी निघणे ही शक्य नव्हते परंतु भंगार चोरांनी मात्र या जाळ्या सहजपणे चोरून नेलेल्या आहेत. अशा लोखंडी जाळ्या चोरून नेण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. आत्तापर्यंत या ठिकाणाहून 1ते दीड टन वजनाच्या लोखंडी जाळ्या भंगार चोरांनी चोरून नेल्या आहेत अशी माहिती नाव न छापण्याच्या अटीवर रेल्वे कर्मचाऱ्यांनीच दिली आहे. या रस्त्यावरील भंगार चोरी RPF पोलिसांच्या चेष्टेचा विषय बनला आहे.
रेल्वे प्रशासनाच्या संबंधित विभागाने RPF पोलिसांकडे तक्रार करून देखील अशा चोरीचा प्रकार थांबत नाहीये त्यामुळे रेल्वे प्रशासन भंगार चोरांपुढे पुरते हतबल झाल्याचे दिसते आहे. रेल्वे प्रशासनाच्या हद्दीतील इतर ठिकाणीही भंगार चोरीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे त्यामुळे रेल्वेच्या मालमत्तेचे संरक्षण करणाऱ्या रेल्वे सुरक्षा बल पोलिसांच्या भूमिकेवरच संशयी नजरेने बघितले जात आहे.