अख्तर काझी
दौंड : पुण्याहून निघणारी पुणे-नांदेड एक्सप्रेस गाडी दौंड रेल्वे हद्दीत आली असता पुढील सिग्नल नसल्याने थांबली याचा फायदा घेत काही अज्ञात चोरट्यांनी गाडीवर दरोडा टाकून प्रवाशांचा किमती ऐवज चोरून नेला असल्याची घटना घडली. चोरट्यांनी प्रवाशांकडील सोन्याचे दागिने,, मोबाईल व रोख रक्कम असा एकूण 1 लाख 81 हजार रुपयांचा ऐवज लुटून नेला असल्याची माहिती समोर आली आहे.
या प्रकरणी महिला प्रवाशाने दिलेल्या तक्रारीवरून दौंड लोहमार्ग पोलिसांनी 12 ते 15 अज्ञात चोरट्यांविरोधात दरोड्याचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार दि. 5 डिसेंबर रोजी रात्री 11 च्या दरम्यान पुण्याहून निघालेली पुणे, नांदेड एक्सप्रेस गाडी कॉर्ड लाईन स्टेशन येण्याआधी पुढील सिग्नल नसल्याने पुणे आउटरला थांबली असता काही अज्ञात चोरट्यांनी डब्याच्या खिडकीतून आत हात घालून खिडकीजवळ बसलेल्या महिला प्रवाशाच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून घेतले, तसेच शेजारीच असलेल्या सहप्रवाशाचा मोबाईल सुद्धा चोरट्यांनी चोरला. त्यामुळे फिर्यादी यांनी आरडाओरडा केल्याने गाडीमध्ये मोठ्या प्रमाणात गोंधळ सुरू झाला.
दरम्यान फिर्यादी यांनी खिडकीतून पाहिले असता चोरटा व त्याचे साथीदार अंधारातून पुढच्या डब्याकडे पळताना दिसले. त्यानंतर थोड्याच वेळात चोरट्यांनी गाडीवर दगडफेक करण्यास सुरुवात केली. या दगडफेकीत फिर्यादी यांचे पती जखमी झाले. गाडी दौंड कॉर्ड लाईन स्टेशनवर आल्यावर जखमी प्रवाशाचे प्रथमोपचार करण्यात आले. त्यावेळेस गाडीतील तिकीट तपासणीसाकडून माहिती मिळाली की गाडीतील आणखी काही प्रवाशांचा सुद्धा किमतीऐवज चोरट्यांनी चोरून नेला आहे.
प्रवासी व्ही शकुंतला यांचे सोन्याचे मंगळसूत्र (कीं.1 लाख 9 हजार 600 रु), पाकीर मोहम्मद अब्दुल बागवान यांचा मोबाईल (कीं.9500रु.), संगीता महादेव कायंदे यांच्या गळ्यातील सोन्याचे डोरले (कीं.34 हजार 980 रु.), सिमरन अनिल गोवंदे यांच्याकडील 4 हजार रु. रोख व 20 ह. रु. किमतीचा मोबाईल, राहुल दिगंबर जाधव यांचे 3 हजार रोख असा एकूण 1 लाख 81 हजार 80 रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लुटून नेला आहे.
घटना घडल्याची खबर मिळाली तेव्हा दौंड लोहमार्ग पोलीस स्टेशनचे सहा. पो. निरीक्षक बाळासाहेब अंतरकर जवळच्या परिसरात रात्रीची गस्त घालित होते. त्यामुळे त्यांनी लागलीच घटनास्थळी धाव घेतली असता त्यांना दूरवर काही चोरटे अंधारातून पळून जाताना दिसले. त्यांनी व त्यांच्या सहकारी पथकाने त्या दिशेने चोरट्यांचा पाटलागही केला परंतु परिसरामध्ये असलेली दाट झाडी व अंधार याचा फायदा घेत चोरटे पसार झाले.