दौंड : दौंड शहरालगत असलेल्या वेताळनगर येथील विद्युत रोहित्रासाठीचे साहित्य बनविणाऱ्या कंपनीवर अज्ञात चोरट्यांनी दरोडा टाकून कंपनीमधील साहित्याची चोरी केल्याची घटना घडली आहे. दरोडेखोरांनी कंपनीमध्ये रात्रपाळीस असणाऱ्या कर्मचाऱ्याचे हातपाय बांधून कंपनीमधील 76 हजार 500 रु. किमतीचे साहित्य लंपास केले आहे.
याप्रकरणी कंपनीचे मालक रोहित बाळासो जगदाळे (रा. वेताळ नगर दौंड) यांनी फिर्याद दिली. दौंड पोलिसांनी सहा अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. दरोड्याची खबर मिळताच बारामती विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, दौंडचे उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस, पोलीस निरीक्षक विनोद घुगे व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक शेळके यांनी घटनास्थळी भेट देऊन कंपनीच्या मालकाकडून घटनेची संपूर्ण माहिती घेतली, व पोलीस पथकाला तपासाच्या सूचना केल्या आहेत.
पोलिसांच्या माहितीनुसार रोहित जगदाळे यांची वेताळ नगर येथे विद्युत रोहित्र साठीचे साहित्य बनविण्याची कंपनी आहे. दिनांक 17 सप्टेंबर रोजी रात्री 10 वा. च्या सुमारास कंपनीचे मालक कंपनीतील सर्व कामे उरकून घरी गेले. रात्री 1.45 वा. दरम्यान त्यांना त्यांच्या काकाचा फोन आला की, तुझ्या कंपनीमध्ये चोरी झाली आहे तू तत्काळ कंपनीत ये. त्यामुळे रोहित जगदाळे लागलीच कंपनीत पोहोचले असता, कंपनीतील रात्रपाळीत असलेला कर्मचारी अक्षय कुमार बिन याने त्यांना सांगितले की,6 अज्ञात चोरट्यांनी कंपनीत प्रवेश केला व त्यांच्याकडील असणाऱ्या प्राणघातक हत्यारांचा धाक दाखवून त्यांनी त्याचे हातपाय बांधले व आरडाओरडा करू नये म्हणून त्याच्या तोंडात कापडाचा गोळा कोंबूला.
यावेळी दरोडेखोरांनी कंपनीच्या गोडाऊन मधील तांब्याची तार, पितळ व ॲल्युमिनियमचे रॉड तसेच कर्मचाऱ्याकडील मोबाईल असा एकूण 76 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरून नेला. सर्व दरोडेखोरांनी आपले चेहरे रुमालाने बांधलेले होते. यापैकी पाच दरोडेखोर अंदाजे 25 ते 35 वर्ष वयोगटाचे तर एकाचे अंदाजे वय 65 वर्ष असावे अशी माहिती कंपनी कर्मचाऱ्याने पोलिसांना दिली आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक चवरे करीत आहेत.