Daund Crime |  पोलीस असल्याचे सांगून कुरकुंभ येथे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यास लुटले

अख्तर काझी

दौंड : मी पोलीस आहे असे सांगून सेवानिवृत्त कर्मचाऱ्याला चाकूचा धाक दाखवून लुटण्यात आल्याची घटना दौंड तालुक्यातील कुरकुंभ येथे घडली आहे. दौंड पोलिसांनी एका अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करीत तपास सुरू केला आहे. याप्रकरणी राज्य परिवहन मंडळातून (एसटी) सेवानिवृत्त झालेले शिवाजी बबन चांदगुडे (रा.बऱ्हाणपूर, तालुका बारामती) यांनी फिर्याद दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सदरची घटना दिनांक 7 जून रोजी रात्री 2 च्या दरम्यान कुरकुंभ चौकात घडली होती. फिर्यादी कुरकुंभ येथील चौकातील एका हॉटेल समोर उभे होते, त्यावेळी एक अनोळखी व्यक्ती तेथे आली व आपण पोलिस असल्याचे सांगून त्यांनी फिर्यादी यांना आपल्या दुचाकीवर बसवत भिगवन रोडवर असणाऱ्या एका मंदिरात नेऊन त्यांना फरशीच्या तुकड्याने मारहाण केली.

यावेळी या इसमाने फिर्यादी यांना चाकूचा धाक दाखवून त्यांच्या खिशातील 4 हजार 500 रुपये व हाताच्या बोटात असलेली सोन्याची अंगठी असा एकूण 44 हजार 500 रुपयांचा ऐवज जबरदस्तीने चोरून नेला होता. या घटनेचा पुढील तपास पोलीस हवालदार नगरे करीत आहेत. सदरची लुटमारीची घटना दि. 7 जूनला घडली मात्र फिर्यादी दवाखान्यात उपचार घेत असल्याने त्यांनी दिनांक 14 जून रोजी तक्रार दाखल केली असल्याची माहिती पोलिसांनी दिली.