CID पोलीस असल्याचे सांगून एकास 46 हजारांस लुटले, दोन अज्ञातांवर गुन्हा दाखल

इंदापूर : इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी हद्दीत असणाऱ्या इरिगेशन जवळ एका वाहन चालकाला CID डिपार्टमेंटचे लोक असल्याचे सांगून त्याकडील 46 हजार रुपये लुटल्याची घटना घडली आहे.

इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी येथे फिर्यादी हेमराज जगन्नाथ गुजर (रा.कानकरिया, राजस्थान) हे त्यांचे ताब्यातील वाहन क्र. आर जे १७ जी ए
६०५२ घेवुन जात असताना एक
अनोळखी मोटर सायकल वर दोन इसम त्यांच्या गाडी जवळ आले आणि फिर्यादीला गाडी बाजुला घ्या, आम्हास तुमची गाडी चेक करायची आहे तुमच्या पाठीमागील राजस्थानी पासींगच्या दोन गाडयामध्ये अफीम पकडला आहे. आम्ही सी.आय.डी चे पोलीस आहे अशी बतावणी करून फिर्यादीची गाडी अडवुन फिर्यादी यांनी सातारा वरून कोळसा खाली करून आणलेले भाडे 46 हजार रुपये हे गाडीचे टुलबॉक्स मध्ये ठेवलेले होते. ते पैसे घेऊन आरोपी फरार झाले.

या घटनेनंतर फिर्यादी हेमराज गुजर यांनी इंदापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून अज्ञात दोन इसमांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोसई लिगाडे करीत आहेत.