यवत, दौंड : यवत जवळ असणाऱ्या शेरु हॉटेल समोर तीन वाहनांच्या झालेल्या विचित्र अपघातात दोघांचा मृत्यू झाला आहे. भरधाव वेगात जाणाऱ्या स्विफ्ट कार ने डिव्हायडर तोडून पलीकडून जाणाऱ्या वाहनांना जोरदार धडक दिल्याने हा भयानक अपघात घडला आहे.
या अपघातामध्ये १) अशोक विश्वनाथराव थोरबोले (वय ५७ वर्षे रा. उरळी कांचन ता. हवेली, पुणे) आणि २) गणेश धनंजय दोरगे (वय २८ वर्षे रा.यवत रावबाचीवाडी ता. दौंड,पुणे) या दोघांचा मृत्यू झाला आहे. याबाबत ज्ञानेश्वर विश्वनाथ थोरबोले, (वय ४९ वर्षें, सध्या रा. उरळी कांचन ता. हवेली जि.पुणे) यांनी यवत पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. थोरबोले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी राकेश मारूती भोसले (रा. बोरीभडक ता. दौंड जि. पुणे) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दि. २०/०८/२०२५ रोजी सायंकाळी ०७.०० च्या सुमारास फिर्यादी हे पुणे सोलापूर हायवे रोडने जात असताना यवत गावच्या पुढे असणाऱ्या शेरू हॉटेल येथे आरोपीने आपल्या ताब्यातील लाल रंगाची स्विफ्ट कार क्र.MH12 UW 5052 ही भरधाव वेगात हयगयीने चालवून हायवेवरील डिव्हायरडर चे कठडे तोडून समोरून येणाऱ्या दोन वाहनांना जोरदार धडक दिली.
या अपघातामध्ये वरील दोन्ही इसमांचा जागीच मृत्यू झाला तर वाहन चालवत असलेले फिर्यादी हे जखमी झाले. फिर्यादी यांच्या फिर्यादीवरून आरोपी राकेश भोसले याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास यवतचे पोसई भोसले करीत आहेत.