कर्ज माफीपासून वंचीत शेतकऱ्यांना 3 लाख कर्जमाफी आणि कृषीपंप विजबिल माफी द्यावी : रयत क्रांती चे मुख्यमंत्र्यांना निवेदन

पुणे : कर्जमाफी पासून वंचित शेतकऱ्यांना तीन लाखापर्यंत कर्जमाफी मिळावी तसेच कृषीपंप विजबिल माफी आणि कांद्याला प्रति किलो 5 रूपये अनुदान मिळावे या मागणीसाठी रयत क्रांती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष भानुदास शिंदे यांकडून मंत्रालयातील मुख्यमंत्री सचिवालयात निवेदन देण्यात आले आहे. मागण्या मान्य न झाल्यास आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे.

सन २००९ ते २०२२ सालातील अनेक थकबाकीदार कर्जदार अनेक शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही त्यामुळे सन 2017 साली झालेल्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना व सन 2019 साली झालेली राज्य सरकारची महात्मा ज्योतिराव फुले कृषी सन्मान कर्ज माफी योजना तसेच नियमित कर्ज फेड करणाऱ्यांना 50 हजार रुपये अनुदान या सर्व कर्जमाफी पासून महाराष्ट्रातील लाखो शेतकरी वंचित राहिले आहेत. कर्जमाफी योजनेतील चुकीचे निकष व अर्धवट कर्जमाफी यामुळे शेतकऱ्यांच्या मध्ये भेदभाव केला जातो व शेतकऱ्यांना एक समान न्याय मिळत नाही. त्यामुळे काही शेतकऱ्यांच्यावय अन्याय होतो. अशा प्रकारे आतापर्यंत झालेल्या 2009 ते 2019 मधील कर्जमाफी मध्ये अनेक शेतकऱ्यांच्या वरती कर्जमाफीचा लाभ न मिळाल्यामुळे अन्याय झाला आहे या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी रयत क्रांती पक्षा तर्फे मुख्यमंत्री साहेबांना निवेदन देण्यात आले आहे.

तसेच कृषी पंप विजबिल माफी व कांद्याला प्रति किलो पाच रुपये अनुदान मिळावे ही मागणी करताना, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना गेली पाच वर्षे झाले आस्मानी व सुलतानी संकटांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी निर्माण झाली आहे. ग्रामीण भागामध्ये प्रचंड प्रमाणात आर्थिक मंदी निर्माण झाली आहे. मागील चार-पाच वर्षांमध्ये अतिवृष्टी, महापूर, चक्रीवादळे,कोरोना महामारी, तसेच शेतीमालाला बाजार भाव न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले असल्याचे यात नमूद करण्यात आले असून शासनाने याकडे संपूर्ण दुर्लक्ष केले असल्याचे म्हटले आहे.

त्यामुळे शेतकऱ्यांना किमान तात्पुरता आधार मिळावा यासाठी शासनाने कांद्याला प्रति किलो पाच रुपये अनुदान थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावे आणि 31 मार्च 2022 पर्यंतच्या 0% पीक कर्ज व्याज परतावा अद्याप शेतकऱ्यांना मिळाला नाही तो त्वरित मिळावा अशी मागणी करण्यात आली आहे. वरील मागणीबरोबरच कृषी पंपाची वीज बिल थकबाकी पूर्णतः माफ करण्यात यावी व पुणे जिल्ह्यातील रखडलेल्या पाझर शेतचार्यांची कामे त्वरित सुरू करण्यात यावी अशी मागणी या निवेदनात करण्यात आली असून हे निवेदन रयत क्रांती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष यांच्या वतीने मंत्रालयामध्ये मुख्यमंत्री सचिवालय महाराष्ट्र शासन या ठिकाणी देण्यात आले आहे.

हे निवेदन देताना रयत क्रांती संघटनेचे सोलापूर जिल्हाध्यक्ष शशिकांत थोरात, जिल्हा सरचिटणीस राजकुमार सरडे, अमोल पताळे, दिलीप ननवरे, पुणे जिल्हा सरचिटणीस सयाजी मोरे, योगेश मोरे उपस्थित होते.